अमेरिकेत "स्त्री देवी कट्टा" या महिलांसाठी कार्यरत असलेल्या ग्रुपने ड्रीम ऍक्ट एंटरटेनमेंट आणि क्लार्क्सबर्ग एमडी म्युझिक ग्रुप यांच्या सहयोगाने ११ सप्टेंबर २०२२ रोजी ‘झंकार- व्हेअर वेस्ट मिट्स ईस्ट’ हा श्रुती भावे यांच्या व्हायोलिन वादनाचा एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम युट्यूब लाइव्ह माध्यमातून स्त्री देवी कट्टाच्या अधिकृत चॅनेलवरून प्रसारित केला गेला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचे दरवर्षी आयोजन केले जाते.
स्त्री देवी कट्टा ग्रुपच्या फाउंडर मेंबर प्रियंवदा जोशी यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. स्त्री देवी कट्टा या आमच्या ग्रुप द्वारे आम्ही नेहमीच विविध उपक्रम आयोजित करत असतो. यावर्षी प्रथमच आमच्या ग्रुपने ‘झंकार - व्हेअर वेस्ट मिट्स ईस्ट’ या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जेव्हा या कार्यक्रमाविषयी आम्ही ड्रीम ऍक्ट एंटरटेनमेंट आणि क्लार्क्सबर्ग एमडी म्युझिक ग्रुप यांच्याशी बोललो तेव्हा यांनी लगेचच मदतीचा हात दिला. ११ सप्टेंबरला प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे, श्रुतीने केलेली गाण्यांची निवड आणि त्यांचा क्रम. या कार्यक्रमासाठी मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेतील गाण्यांची निवड केली होती. शास्त्रीय, उप-शास्त्रीय, चित्रपट संगीत, भावगीत, भक्तीगीत आणि फ्युजन अशा विविध प्रकारच्या संगीताचा आस्वाद चाहत्यांना घेता आला असं म्हटलं आहे.
श्रुती भावे यांनी सादर केलेली हॉलिवूड-बॉलिवूड थिम आणि 'या रावजी बसा भावजी' लावणीचं अरेबिक संगीताबरोबर केलेलं फ्युजन विशेष उल्लेखनीय होतं. अत्यंत सहजतेने श्रुती भावे यांनी सर्व गीत प्रकार व्हायोलिनवर लीलया सादर केले. या कार्यक्रमास अपूर्व द्रविड (तबला), दर्शना जोग (की-बोर्ड), अभिजीत भदे (इलेक्ट्रॉनिक परकशन्स आणि ऑक्टोपॅड), विशाल थेलकर (गिटार) या कलाकारांनी साजेशी साथ केली. देवेंद्र जोशी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि अशोक शेलार यांच्या टीमने कॅमेरा आणि लाइव्ह स्ट्रीमिंगची जबाबदारी सांभाळली. अमित जोशी यांच्या कॉस्मिक बीट्स या स्टुडिओ मधून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या कार्यक्रमात पूजा चौहान यांनी गणपती बाप्पांचं लाईव्ह काढलेलं चित्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. या कार्यक्रमाला भरभरून दाद देणाऱ्या प्रेक्षकांचे प्रियंवदा जोशी यांनी आभार मानले.