जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीन मेटाकुटीला आलेली असताना पहिल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडून चिंतेची बातमी येत आहे. अमेरिकेत निवडणुका येत आहेत आणि राजकारण सुरु झाले आहे. यातच अमेरिकेमध्ये शटडाऊनचा धोका वाढू लागला आहे.
अमेरिकेत शटडाऊन होणार की नाही हे समजण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी बाकी आहे. सरकारी फंडिंगचे फेडरल आर्थिक वर्ष 30 सप्टेंबर 2023 ला संपत आहे. त्यापूर्वी बायडेन सरकारला विरोधकांच्या संमतीने निधीची योजना मंजूर करावी लागणार आहे.
जर असे झाले नाही तर १ ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन होण्याची शक्यता आहे. असे झाले तर मोठे आर्थिक संकट अमेरिकेवर उभे ठाकेल. कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी अमेरिकेकडे पैसे राहणार नाहीत. विविध विकासमकामे, योजनांसाठी पैसे मिळणार नाहीत.
अमेरिकेचे एकूण कर्ज 33 ट्रिलियन डॉलरच्या वर गेला आहे. एका तिमाहीत त्यात 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. विरोधी पक्ष रिपब्लिकन देखील यावरून टीका करत आहे. अमेरिकेवरील कर्ज हे जीडीपीपेक्षाही अधिक वाढू लागले आहे, असे ते म्हणत आहेत. अनावश्यक योजना बंद कराव्यात असे त्यांचे म्हणणे आहे. या मागण्यांसह विरोधक आपल्या मागण्यांवर ठाम असून, करार झाला नाही तर अमेरिकेत शटडाऊन अटळ आहे.