पाकिस्तानात पुन्हा एकदा मंदिराला निशाणा बनवण्यात आलं आहे. पंजाब प्रांतातील सादिकाबाद जिल्ह्यातील भोंग शरीफ गावात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात बुधवारी संध्याकाळी काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.
व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात काही लोकं मंदिराच्या आत लाठी-काठ्या घेऊन शिरत आहेत. तसंच त्यानंतर मंदिरात तोडफोड सुरू करतानाही यात दिसत आहेत. व्हिडीओमध्ये मंदिरातील मुर्तींसह अन्य काही भागांचही नुकसान करताना लोक दिसत आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. तसंच पोलीस या घटनेचा तपासही करत आहेत.
खेदजनक कृत्य : खा. रमेश वंकनानीया प्रकरणी इम्रान खान यांच्या सत्ताधारी पक्षाचे खासदार रमेश वंकवानी यांनी भोंग शरीफ या ठिकाणी झालेल्या मंदिराच्या तोडफोडीचं कृत्य हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया दिली. दोषींना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधीशांकडेही दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.