रेकजाविक (आइसलँड) : आइसलँडच्या बारदरबंगा ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची चिन्हे असल्यामुळे या भागातील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. युरोपच्या सर्वात मोठ्या वंतोजोकुल ग्लेशियरच्या बर्फात दबलेल्या या ज्वालामुखीतून काही लाव्हा निघाला असून गेल्या आठवड्यात येथे काही भूकंप झाले आहेत. भूगर्भीय हालचालींवरून उद्रेकाची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट होते, असे आइसलँडच्या हवामान विभागातील ज्वालामुखी तज्ज्ञ मेलिसा फेफर यांनी शनिवारी सांगितले. हा ज्वालामुखी राजधानी रेकजाविकपासून २०० मैलावर असून हा भाग पूर्णपणे निर्मनुष्य आहे. शास्त्रज्ञ शनिवारी दुपारी ज्वालामुखीच्या जवळ गेले होते; मात्र उद्रेकाचे कोणतेही संकेत दिसून आले नाहीत, असे नागरी सुरक्षा विभागाने म्हटले आहे. हवामान खात्यानेही गेल्या शनिवारी उद्रेकाची कोणतीच चिन्हे नसल्याचे म्हटले होते; मात्र प्रशासनाने अद्यापही उड्डयन सतर्कतेची जी पातळी ठेवली आहे त्यावरून ज्वालामुखीचा उद्रेक होण्याचा धोका असल्याचे संकेत मिळतात. (वृत्तसंस्था)
बारदरबंगा ज्वालामुखीच्या उद्रेकाची चिन्हे
By admin | Published: August 25, 2014 4:28 AM