फिलाडेल्फिया : अमेरिकेत अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पूर्वोत्तरच्या पाच राज्यांत विजय मिळविल्यानंतर ट्रम्प यांनी स्वत:ला संभाव्य उमेदवार घोषित केले आहे, तर हिलरी यांनीही आपली दावेदारी मजबूत केली आहे. नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता ट्रम्प विरुद्ध हिलरी क्लिंटन असे चित्र दिसणार हे निश्चित आहे. ट्रम्प यांनी मेरीलँड, कनेक्टिकट, डेलावेयर, पेनसिल्वेनिया आणि रोड आयलँडमध्ये विजय मिळविला आहे. रिपब्लिकनचे उमेदवार होण्यासाठी त्यांना १२३७ प्रतिनिधींचे समर्थन आवश्यक आहे. सध्या त्यांच्याकडे ९५० प्रतिनिधींचे समर्थन आहे. दरम्यान, ट्रम्प यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी टेड क्रूज यांना ५६९ प्रतिनिधींचे समर्थन आहे. हिलरी यांनी मेरीलँड, कनेक्टिकट, डेलावेयर आणि पेनसिल्वेनिया येथे विजय मिळविला आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स रोड आयलँडमध्ये विजयी झाले. हिलरी यांच्याकडे सध्या २१४१ प्रतिनिधींचे समर्थन आहे, तर सँडर्स यांना १३२१ प्रतिनिधींचे समर्थन आहे. (वृत्तसंस्था)आता आगामी मंगळवारी इंडियानात प्रायमरी निवडणूक होणार आहे. येथे ट्रम्प यांना रोखण्यासाठी क्रूज आणि कैसिच यांनी राजकीय आघाडी केली आहे. त्यानुसार कैसिच इंडियानात प्रचार करत नाहीत. तर क्रूज न्यू मेक्सिकोत आणि ओरेगनमध्ये प्रचार करणार नाहीत. ...........
अमेरिकेत ट्रम्प विरुद्ध हिलरी लढतीचीच चिन्हे
By admin | Published: April 28, 2016 4:19 AM