लाहोर : पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यक समाजावर अन्याय होत असल्याचे आता जगजाहीर झाले आहे. येथील एका शीख पोलीस अधिका-याच्या घरात घूसून काही लोकांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. तसेच, त्यांच्या डोक्यावरील पगडी काढून केसांना धरुन त्यांना घरातून बाहेर काढले. शीख पोलीस अधिकारी गुलाब सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
गुलाब सिंह यांनी घडलेल्या प्रकारबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, मी पाकिस्तानमधील पहिला शीख ट्रॅफिक वॉर्डन आहे. चोरांना किंवा दरोडेखोरांना जशी वागणूक दिली जाते, तशी मला याठिकाणी देण्यात येत आहे. माझ्या घरातून मला खेचून बाहेर काढण्यात आले आणि माझ्या घराला कुलूप लावण्यात आले.
याचबरोबर, गुलाब सिंह म्हणाले, अतिरिक्त सेक्रेटरी तारिक वझीर आणि पाकिस्तान गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे माजी प्रमुख तारा सिंह यांनी काही लोकांना खुश करण्यासाठी हे काम केले आहे. कोर्टात माझ्यावर खटला सुरु आहे. संपूर्ण गावात मला लक्ष केले जात आहे. तसेच, माझे घर सुद्धा खाली करायला त्यांनी मला भाग पाडले. तुम्ही पाहू शकता की माझ्या डोक्यावर पगडी सुद्धा नाही आहे. त्यांनी माझी पगडी काढून नेली आहे.
दरम्यान, याप्रकरणी गुलाब सिंह यांनी लोकांकडे मदत मागितली आहे. ते म्हणाले, मी तुम्हाला विनंती करतो. मला जास्तीत जास्त मदत करा आणि हा व्हिडीओ शेअर करुन जगाला सांगा की पाकिस्तानात शीख समुदायावर अन्याय होत आहेत.