इस्लामाबाद : भारतातून कर्तारपूरला येणाऱ्या शीख भाविकांना पासपोर्टची आवश्यकता भासणार नाही, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी केली. श्री गुरू नानक देवजी यांचे ५५० वे प्रकाश पर्व आणि उद्घाटन समारंभासाठी कोणतेही शुल्क वसूल केले जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.
कर्तारपूर कॉरिडॉर ९ नोव्हेंबरपासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. इम्रान खान यांनी टष्ट्वीट केले आहे की, भारतातून कर्तारपूरला येणाºया शीख भाविकांना पासपोर्टची आवश्यकता असणार नाही. केवळ ओळखपत्र लागेल. या भाविकांनी दहा दिवस अगोदर नोंदणी करण्याची आवश्यकताही नसेल. उद्घाटन समारंभासाठी कोणतेही शुल्क वसूल केले जाणार नाही. हा बहुप्रतीक्षित कॉरिडॉर पंजाबच्या गुरुदासपूरस्थित डेराबाबा नानक गुरुद्वाराला कर्तारपूरच्या गुरुद्वारा दरबार साहिबला जोडतो. आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ चार कि. मी. दूर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात नरोवाल जिल्ह्यात आहे. शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी हे पाकिस्तानातील कर्तारपूरमध्ये रावी नदीच्या किनारीस्थित दरबार साहिब गुरुद्वारात १८ वर्षे होते. त्यामुळे भाविकांसाठी हे एक पवित्र स्थळ आहे. दोन्ही देशात याबाबत करार झाला असून, ५ हजार भारतीय भाविक दररोज दरबार साहिब गुरुद्वाराला जाऊ शकतील.