आधीपेक्षा जास्त वेगानं पसरणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वीच आढळून आला. त्यानंतर आता ब्रिटनमध्येच कोरोनाचा आणखी एक स्ट्रेन आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. कोरोनाचा हा दुसरा स्ट्रेन जास्त धोकादायक आहे. तो वेगानं संक्रमित होत असल्यानं जगाची चिंता वाढली आहे. त्यामुळे, ब्रिटनमधून परदेशात जाणारी हवाई वाहतूकही बंद करण्यात आली आहे. तर, ब्रिटन आणि फ्रान्स सीमारेषेवर हजारो ट्रक्स अडकून पडल्या आहेत.
एका बाजूला जगातील काही देशांनी कोरोना लसीकरण सुरू असताना कोरोनाचे नवे स्ट्रेन सापडत असल्यानं काळजी घेणं अतिशय गरजेचं बनलं आहे. भारताने ब्रिटनमधून येणारी हवाई वाहतूक पुढील 15 दिवसांसाठी बंद केली आहे. तर, दुसरीकडे फ्रान्सनेही ब्रिटनच्या सीमारेषेला बंद केले आहे. त्यामुळे, हजारो ट्रक ड्रायव्हर या सीमारेषेवर अडकून पडले आहेत. त्यामुळे, अचानक झालेल्या बंदमुळे या ट्रक ड्रायव्हरचे खाण्या-पिण्याचे वांदे झाले आहेत. मात्र, माणूसकीचा धर्म लक्षात घेऊन, ब्रिटनमधील काही शीख बांधवांनी दक्षिणी इंग्लंडमध्ये फसलेल्या हजारो ट्रक ड्रायव्हर्संना गरमा-गरम जेवण पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे फ्रान्सला जाण्यासाठी इंग्लंडच्या सीमारेषेवर 1500 पेक्षा जास्त अडकून पडल्या आहेत. जर, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली नाही, तर ब्रिटनमध्ये खाद्यपदार्थांची कमतरता पडू शकते. त्यामुळे, ब्रिटिशचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मैंक्रो यांच्याशी संवाद साधत शिथिलता देण्याची विनंती केली आहे.
मंगळवारी एका शीख समुदायाच्या चॅरीटी ट्रस्टने सीमारेषेवर कँप बनवून राहणाऱ्या जवळपास 1 हजार ट्रक ड्रायव्हर्संना गरमा-गरम भोजन दिले. छोले-राईस आणि मशरुप पास्ता बनवून त्यांना जेऊ घातले. तसेच, स्थानिक रेस्टॉरंटने देऊ केलेले पिझ्झाही या ड्रायव्हर्संना देण्यात आले. येथे अडकून पडलेल्या ट्रक ड्रायव्हर्संमध्ये अधिकाधिक ड्रायव्हर हे नाताळनिमित्त आपल्या घरी जाण्यास उत्सुक आहेत. खालसा चॅरीटी संघटनेने ट्वीट करुन माहिती देताना सांगितले की, डोमिनोज ढिल्लों ग्रुप फ्रँचाईजीद्वारे ट्राक ड्रायव्हर्संसाठी 1000 पिझ्झा पोहोच करण्यात आला. या सर्व अन्नदात्यांचे आम्ही आभार मानतो, असे संघटनेनं म्हटलंय.
येथील ट्रक ड्रायव्हर्संना अन्न-पाण्याची मदत व्हावी, यासाठी स्थानिक लोकं पुढाकार घेत आहेत. शीख समुदायाच्या उप्रकमानंतर अनेकांनी मदतीचा हात देऊ केलाय.