वाॅशिंग्टन: अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा बॅंकिंग क्षेत्रावर संकट आले आहे. तेथील सिलिकाॅन व्हॅली बॅंक बंद करण्याचे आदेश नियामकाने दिले आहेत. बॅंकेची मूळ कंपनी सिलिकाॅन व्हॅली फायनान्शियल समूहाचे शेअर्स ८५ टक्क्यांनी काेसळले. त्यानंतर बॅंकेचे कामकाज थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या संकटामुळे अमेरिकेतील बॅंकांना शेअर बाजारात सुमारे १०० अब्ज डाॅलर्सचा फटका बसला आहे.
सिलिकाॅन व्हॅली बॅंकेचे फेडरल डिपाॅझिट इन्शुरंस कार्पाेरेशनने अधिग्रहण करण्याची घाेषणा केली. कार्पाेरेशनवर ग्राहकांचा पैसा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. बॅंक बंद करण्याच्या घाेषणेनंतर शेकडाे ग्राहकांच्या रांगा बॅंकेच्या विविध शाखा आणि एटीएमसमाेर दिसून आल्या. बॅंक आता साेमवारी उघडणार असून तेव्हा विमा काढलेल्या ठेवीदारांना पैसे काढता येतील. (वृत्तसंस्था)
या कारणांमुळे बुडाली बॅंक
- बॅंकेने गेल्या दाेन वर्षांमध्ये अब्जावधी डाॅलर्स रकमेचे बाॅंड खरेदी केले हाेते. मात्र, त्यावर कमी व्याज मिळाल्यामुळे बॅंकेला चांगला परतावा मिळाला नाही. त्यातच फेडरल रिझर्व्हने व्याज दर वाढविले. - बॅंकेचे बहुतांश ग्राहक हे स्टार्टअप्स आणि टेक कंपन्या हाेत्या. व्यवसाय कमी झाल्यामुळे त्यांनी पैसे काढण्यास सुरुवात केली. याचा परिणाम झाला.
भारतातही परिणाम: सिलिकाॅन व्हॅली बॅंकेवर बंदी घातल्यानंतर केवळ भारतच नव्हे तर इतर देशांमध्येही बॅंकांचे शेअर्स काेसळले. या बॅंकेने भारतातील २१ स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे येथेही परिणाम दिसू शकताे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"