लंडन : आयर्लंडच्या पंतप्रधानपदावरून लिओ वराडकर पायउतार होताच आता या पदावर सायमन हॅरिस यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. हॅरिस हे आयर्लंडचे सर्वांत तरुण पंतप्रधान म्हणून ओळखले जातील. त्यांचे वय अवघे ३७ वर्षे आहे.
गेल्याच आठवड्यात लिओ वराडकर या मराठमोळ्या पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या सत्ताधारी फाइन गाएल पक्षाच्या बैठकीत सायमन हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सध्या हॅरिस ईस्टरच्या निमित्ताने सुटीवर आहेत. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होऊन ते पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात, असे सुत्रांनी सांगितले. वराडकर यांच्या जागी पक्षाने संधी दिल्याबद्दल हॅरिस यांनी पक्षाचे आभार मानले.