कोरोना महामारीला सर्वोत्तम प्रकारे हाताळणाऱ्या सिंगापूरनं कोरोनाच्या महामारीशी लढण्यासाठी लवकरच दैनंदिन जीवनात मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. ज्यापद्धतीनं एखाद्या तापाच्या साथीला तोंड दिलं जातं आता त्याच पद्धतीनं कोरोना प्रादुर्भावाकडे लक्ष दिलं जाणार आहे. म्हणजेच देशासमोर आता 'झिरो ट्रान्समिशन' हे लक्ष्य असणार नाही. यात्रेकरुंना क्वारंटाइन देखील करण्यात येणार नाही आणि कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णालाही आयसोलेट करण्यात येणार नाही, अशी घोषणा सिंगापूरनं केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे, देशात दैनंदिनरित्या जाहीर केल्या जाणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी देखील आता जारी करण्यात येणार नाही. असं असलं तरी नागरिकांना दुकानांत किंवा कार्यालयात जाण्यासाठी कोरोनाची चाचणी करण्याचा नियम यापुढेही कायम राहणार आहे. कोरोना सोबत जगण्याची तयारी आता आपण करायला हवी आणि हे नुसतं बोलून नव्हे, तर कृतीत आणण्याची गरज आता निर्माण झाली आहे, असं सिंगापूरच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं सांगितलं.
सिंगापूरचे वाणिज्यमंत्री गान किम योंग, अर्थमंत्री लॉरेंस वोंग आणि आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी या आठवड्यात स्ट्रेट्स टाइम्समध्ये एक संपादकीय लेख लिहीला होता. यात कोरोना या जगातून कधीच जाणार नाही ही वाईट बातमी आहे आणि चांगली बातमी अशी की या विषाणूसोबतच जगण्याची पद्धत आपण अंमलात आणू शकतो, असं म्हटलं होतं.
सिंगापूरमध्ये दररोज २० ते ३० नवे रुग्णइतर देशांप्रमाणेच सिंगापूरमध्येही गेल्या वर्षी कोरोनाचं प्रमाण प्रचंड होतं. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत देशात दररोज ६०० रुग्णांची वाढ होत होती. ऑगस्टमध्ये लाट ओसरल्यानंतर सिंगापूरमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त दिसून आलेला नाही. दरम्यान, केवळ ५७ लाख लोकसंख्या असेलल्या सिंगापूरमध्ये दररोज २० ते ३० नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर आतापर्यंत देशात ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इतर देशांप्रमाणेच सिंगापूरमध्येही निर्बंध लागू आहेत. यात देशात दाखल होताच कोरोना चाचणी, हॉटेल क्वारंटाइन आणि होम आयसोलेशन अशा नियमांचा समावेश आहे.
कोरोनाला नष्ट करणं शक्य नाही, त्यासोबतच जगावं लागेलकुंग, योंग आणि वोंग या सिंगापूरच्या मंत्र्यांद्वारे देशात आणल्या जाणाऱ्या प्लाननंतर गोष्टी बदलतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तिन्ही मंत्री देशाच्या कोविड-१० मल्टी-मिनिस्ट्री टास्क फोर्सचे सदस्य देखील आहे. "दरवर्षी अनेकांना ताप येतो. यात अनेकजण रुग्णालयात दाखल न होताच बरे होतात. अतिशय कमी जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते आणि खूप कमी जणांचा यात मृत्यू होता. यात मृत्यू होणाऱ्यांमध्ये वृद्धांचाच सर्वाधिक समावेश असतो. म्हणजेच काय तर आपण याआधीही अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड देत आले आहोत. त्यामुळे यापुढील काळातही एकाद्या तापाच्या साथीप्रमाणेच कोरोनाला महत्व द्यावं लागणार आहे. कारण कोरोना काही नष्ट होणार नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगायला शिकणं महत्वाचं झालं आहे", असं सिंगापूरच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे.