पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. यानंतर पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी सेमीकंडक्टर फॅक्ट्रीला भेट दिली. सेमीकंडक्टर्सचे उत्पादन आणि डिझाइनिंगसंदर्भात दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले. भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्याची पंतप्रधान मोदींची इच्छा आहे. यासाठी सरकार बरेच प्रयत्न करत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सेमीकंडक्टर फॅक्ट्रीला भेट देऊन तेथील तंत्रज्ञान, कार्यपद्धती आदी समजून घेतले. सिंगापूरमधील AEM होल्डिंग्ज सेमीकंडक्टर कारखान्यात पोहोचल्यानंतर, पंतप्रधान लॉरेन्स वँग यांनी पंतप्रधान मोदींना कारखाना आणि सेमीकंडक्टरसंदर्भात सविस्तर माहिती दिली.
हा सेमीकंडक्टर एवढा विशेष का? - या छोट्याशा चिपसाठी संपूर्ण जग धडपडत आहे. कारण ही छोटीशी चिप भविष्यातील फ्यूएल आहे. जिच्यावर संपूर्ण जगातील इलेक्ट्रॉनिक मार्केट अवलंबून आहे. या छोट्याशा चिपला इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे हार्ट म्हणणे चूक ठरणार नाही. स्मार्टफोन, कार, डेटा सेंटर, कंप्यूटर, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट उपकरणे, फार्मास्यूटिकल डिव्हायसेस, कृषी उपकरणे, अगदी एटीएम यांसारखी जीवनावश्यक उत्पादनेही सेमीकंडक्टरशिवाय अशक्य आहेत.
या छोट्या चिपसाठी का धडपडतंय संपूर्ण जग? -ही चिप एवढी महत्त्वाची असल्याने, साहजिकच तिच्यावर ज्या देशाचे वर्चस्व असेल तो आगामी काळात सर्वात शक्तिशाली देश असेल. यामुळेच भारत सरकार चिप उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. या छोट्याशा चिपचे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे महत्व आहे, हे सरकारला माहीत आहे. यामुळेच जगभरातील सेमीकंडक्टर कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. सध्या सेमीकंडक्टर चिपवर चीनचे वर्चस्व आहे.