इस्रायलच्या सैन्याने रविवारी एकाचवेळी लेबनान आणि गाझा पट्टीमध्ये जोरदार हल्ले केले आहेत. हिजबुल्लाहवरील पेजर, वॉकीटॉकी हल्ल्यानंतर इस्रायलवर पलटवार करण्यात आला होता. सुमारे शंभरहून अधिक मिसाईल इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा चकवून घुसली होती. यामुळे नागरिकांना बंकरमध्ये लपावे लागले होते. अशातच इस्रायलने केलेल्या पलटवारात गाझा पट्टीतील एका शाळेत २० हून अधिक फिलिस्तिनी नागरिक मारले गेले होते. यात हमासचा नवा नेता याह्या सिनवार देखील मारला गेल्याचे वृत्त आहे.
मीडिया रिपोर्टनुसार शनिवारी गाझा पट्टीमध्ये फिलिस्तीनींना आश्रय देणाऱ्या शाळेवर हल्ला झाला त्यात सिनवारचाही मृत्यू झाल्याच्या वृत्ताची इस्रायल चौकशी करत आहे. या शाळेच्या आडून हमास कमांड सेंटर चालवत होता. यामुळे या शाळेवर रॉकेट डागण्यात आले. परंतू, फिलिस्तानी आरोग्य अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले असून त्यात महिला आणि मुले होती असा दावा करण्यात आला आहे.
एका गुप्त माहितीनुसार या शाळेत सिनवारही होता. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इस्त्रायलने दिले होते. सैन्याला मिळालेल्या गुप्त माहितीवरून हे वृत्त देण्यात आले आहे. तर वल्ला या न्यूज साईटने सिनवार मारला गेल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार सिनवार जिवंत आहे.
टाईम्स ऑफ इस्रायलने पुढे म्हटले की सिनवारचा इतिहास पाहता तो कदाचित मेला नसावा. यापूर्वीच्या हल्ल्यांनंतर तो बेपत्ता झाला होता तेव्हा त्याच्या मृत्यूबद्दल अटकळ बांधली जाऊ लागली होती. इस्रायली पत्रकार बराक रविड यांनी देखील याबाबत पोस्ट केली आहे. जेरुसलेमकडे हमासचा नेता मारला गेला आहे, असे प्रत्यक्ष माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे, असे ते म्हणाले.
दोन महिन्यांपूर्वी हमासच्या प्रमुखाला इराणमध्ये राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यानंतर ठार मारण्यात आले होते. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता सिनवारला प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले होते. यानंतर इस्रायल सिनवारच्या मागे लागला होता. सिनवार वर हल्लाही करण्यात आला होता, परंतू तो तेथून निसटला होता. आता पुन्हा एकदा सिनवार मारला गेल्याचे वृत्त आले आहे.