हातात स्मार्ट फोन आले आणि माणसं आळशी झाली. वाढत्या वयातली मुलं, तरुण मुलं तर एक सेकंद स्मार्ट फोन हातावेगळा ठेवत नाहीत. वडीलधाऱ्यांचं बोलणंच त्यांना ऐकू येत नाही. सतत सोशल मीडियात असतात. पॉर्न कंटेट पाहतात आणि शेअर करतात. त्याची चटक लागल्याने व्यक्तिगत आयुष्यात ते लैंगिक संबंधांच्या भलभलत्या कल्पना घेऊन जगतात आणि आपल्या जोडीदाराकडून तशीच अपेक्षा करत आक्रमक होतात.
- हे सारं वाचून कुणालाही वाटेल की यात नवीन काय आहे, हे चालू वर्तमानकाळात कुठल्याही समाजाचं चित्र आहे. पण, वर नमूद केलेल्या या समस्या शहरी किंवा नागर समाजाच्या नाहीत. ब्राझीलमधल्या अमेझॉनच्या जंगलात खूप आत आत घनदाट अरण्यात राहणाऱ्या आणि अजूनही बऱ्यापैकी आदिम आयुष्यच जगणाऱ्या मारुबाे नावाच्या आदिवासी जमातीचं हे चित्र आहे. अमेझॉनच्या जंगलात आता ते फक्त २००० लोक आहेत आणि त्यांच्यासमोर नवीन संकट उभं राहिलं ते म्हणजे इंटरनेटचं. इलॉन मस्कच्या स्टारलिंक या सेवेनं नऊ महिन्यांपूर्वी अमेझॉनच्या जंगलामध्ये अत्यंत दुर्गम भागात इंटरनेट पोहोचवलं. नेहमीच्या इंटरनेट सेवांपेक्षा वेगळी, पृथ्वीभोवती लगतच्या कक्षेतून फिरणारे सॅटेलाइट उपग्रह वापरून दुर्गम भागात इंटरनेट सेवा पोहोचविण्याचे काम हा उपक्रम करतो. मारुबो नावाच्या आदिवासींपर्यंत ही सेवा पोहोचली तेव्हा त्यांनाही विलक्षण आनंद झाला होता. त्यांच्यासाठी एकदम नवीन जग खुलं झालं. भरपूर माहिती, जगात लोक कुठं कुठं राहतात, जग किती मोठं आहे, कोणकोणती कामं नागरी समाजात केली जातात, कोणत्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, मदत कुठं मिळू शकते अशी सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली. अर्थातच तिथं सगळ्यांना आनंद झाला.
पण, हळूहळू वडीलधारी माणसं मात्र या इंटरनेटवर आणि हातात स्मार्टफोन घेऊन बसणाऱ्या तरुण मुलांवर चिडू लागली. एकाएकी या मुलांना कमी ऐकायला यायला लागलं की ते मोठ्यांकडे दुर्लक्ष करतात हेच कळेना. ही मुलं रोजची नेमून दिलेली कामं करीत नव्हती. सतत मोबाइल पाहू लागली. आळशी झाली. एकाच जागी बसून राहू लागली. आणि नंतर लक्षात आलं की या मुलांना तर सोशल मीडिया पाहण्याचं आणि त्याचबरोबर पोर्न कंटेट पाहण्याचं व्यसन लागलं आहे. ते इतके ॲडिक्ट झाले की जरा कुणी त्यांना काही बोललं की ते चिडचिड करू लागले. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या आदिवासी जमातीचे चारचौघात वागण्याचे नियम, रीतिभाती पारंपरिक असून, ते नियम कुणी मोडत नाही. स्त्रीपुरुषांनी चारचौघांत जवळीक किंवा चुंबन हे तर निषिद्ध मानलं जातं. त्याच जमातीतले तरुण पॉर्न कंटेट शेअर करू लागले याची मोठी चिंता वडीलधाऱ्यांना वाटू लागली.
या जमातीतल्या ७३ वर्षांच्या आजी साइनाम मारुबो सांगतात, इंटरनेट आलं तेव्हा आम्हाला फार छान वाटलं होतं. पण, आता वाटतंय की सगळंच हाताबाहेर गेलं. आमची तरुण मुलं प्रचंड आळशी झाली आहेत. त्या व्हिडीओतले गोरे लोक जसे वागतात तसं ही वागू लागली आहेत. त्यांच्याकडून आता इंटरनेट काढून घेता येत नाही, ते पूर्णच बंद करावं असं आता मलाही वाटत नाही. पण, आळशीपणाचं मात्र काहीतरी करावं लागेल!’
पॉर्न कंटेट आणि सोशल मीडियातलं स्क्रोलिंग ही एकच समस्या नाही तर आता त्यांना बाहेरच्या जगातले घोटाळे, हिंसाचार, अफवा आणि काही चुकीची अशास्त्रीय माहितीही कळू लागली आहे. त्यातून त्यांच्या लैंगिक अपेक्षाही बदलल्या आणि आता ते अधिक आक्रमक होत जोडीदाराला त्रासही देऊ लागले आहेत. हे सारं नियंत्रणात आणायचं म्हणून जमातीच्या म्होरक्यांनी निर्णय घेतला की इंटरनेट वापराच्या वेळा ठरविल्या जातील. म्हणून मग आता सकाळी दोन तास आणि सायंकाळी पाच तास अशी इंटरनेट सेवा सुरू असते. रविवारी मात्र पूर्ण दिवस सुरू असते. बाकी काळात बंद. त्याचा काही उपयोग झाला किंवा त्याला तरुण मुलांनी संमती दर्शविली की नाही हे कळू शकलं नाही, पण तूर्त तरी असा नियम लागू करण्यात आलेला आहे.
निसर्गाच्या अगदी जवळ राहून अजूनही आदिम चालीरीतींप्रमाणं जगणारी ही आदिवासी माणसं इंटरनेट आल्यानं मात्र आता हैराण आहेत की नेमकं एवढ्या माहितीचं आपण करायचं काय ?
नदीकाठची साधी माणसंइटूई नदीकाठी या जमातीचे लोक लांब लांब जंगलात, लहानशा पारंपरिक झोपड्यात राहतात. महिला मुख्यत्वे स्वयंपाक करतात आणि मुलं सांभाळतात. पुरुष कष्टाची कामं करतात. केळी आणि मॅनिओकची लागवड, शिकार, ही कामं पुरुषांची. निर्णय घेताना महिलांचा सल्ला घेतला जातो, निर्णय प्रक्रियेत त्या सहभागी असतात. त्यांच्या निसर्गस्नेही जगण्यात इंटरनेट आलं आणि चित्र बदलायला लागलं.