लंडन- आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता घरोघरी होऊ लागला आहे. तसेच मोबाइल फोनमध्येही असणारी सिरी ही काल्पनिक व्यक्ती आपल्या बोलण्यातील, आपल्याला येणाऱ्या समस्यांमधून, आपण नेहमी करत असलेल्या कामातून, लिहिण्यातून शब्द निवडून त्याची माहिती परस्पर देऊ लागते. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरामुळे जगभरातील कोणत्याही कल्पनेचा नुसता उच्चार केला तरी सिरी आपल्याला देते. मात्र इंग्लंडच्या एका मंत्र्यांना मात्र सिरीमुळे एका हास्यस्पद अनुभवाला सामोरे जावे लागले.
इंग्लंडचे संरक्षण मंत्री गॅविन विल्यमसन हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे इंग्लंडच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आयसीस या दहशतवादी संघटनेबाबत भाषण करत होते. आसीसच्या विरोधात लढण्यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत असे बोलत असताना अचानक त्यांच्यामधून सिरी बोलू लागली ती म्हणाली,'' हाय गॅविन आय फाऊंड समथिंग ऑन द वेब फॉर... इन सीरिया, डेमोक्रॅटिक सपोर्टेड बाय....'' गॅविन मला या संदर्भात काहीतरी माहिती सापडली आहे असे सांगत ती आयसीस काय आहे याची माहिती देऊ लागली. सिरीच्या या अडथळ्या हाऊस ऑफ कॉमन्सचे शिस्तप्रिय आणि नियमांवर सतत बोट ठेवून कारभार चालवणारे सभापती जॉव बर्को मात्र चांगलेच वैतागले. त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. सिरीचे पुढचे बोलणे ऐकण्याआधीच विल्यमसन यांनी फोन बंद केला. सभागृहातील वातावरण पाहून आपल्याच फोनने भाषणात अडथळा आणण्याची ही दुर्मिळ वेळ असावी अशी टिप्पणी करत त्यांनी भाषण चालू ठेवले.भाषणानंतर विल्यमसन यांनी ट्वीटरवर हा नवा आयफोन कसा वापरायचा हे आपल्या 13 वर्षांच्या मुलीकडून शिकून घेतले पाहिजे असं ट्वीट केलं आहे. ट्वीटर वापरणाऱ्य़ा लोकांना विल्यमसन यांच्याबाबतीत झालेल्या प्रकारामुळे नवे खाद्य मिळाले आणि ट्वीटरवर विनोदांचा पाऊसच पडला. यापुर्वीही इंग्लंडमधील वाहतूक मंत्री जो जॉन्सन यांच्या सिरीने असाच अडथळा आणला होता.