कैरो : इजिप्तचे माजी लष्करप्रमुख अब्देल फतह अल-सिसी यांनी रविवारी देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मे महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये सिसी यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला होता. त्यांच्या विजयाने लष्कराची सत्तेवरील पकड अधिक घट्ट झाली आहे. सिसी यांना ९६.६ टक्के मते मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यात नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. इस्लामी नेते मोहंमद मुर्सी सरकारच्या गच्छंतीनंतर जवळपास एक वर्षाने इजिप्तला नवे राष्ट्राध्यक्ष प्राप्त झाले आहेत. त्यांनी राजधानी कैरोतील सर्वोच्च घटनापीठाच्या आमसभेसमोर आयोजित समारंभात पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांना बंदुकीच्या २१ फैरी झाडून सलामी देण्यात आली. सिसी हे इजिप्तचे सातवे राष्ट्राध्यक्ष बनले. या समारंभाला पंतप्रधान इब्राहीम महताब आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, तसेच सिसी यांच्या पत्नी आणि कुटुंबीय उपस्थित होते. (वृत्तसंस्था)शपथविधी सोहळ्याचे टीव्हीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. इजिप्शियन माध्यमांना हल्ल्याची भीती वर्तविली असल्याने आज देशभर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. इस्लामी नेते मुर्सी यांचे सरकार उलथवून टाकणाऱ्या सिसी यांनी देशात स्थैर्य निर्माण करण्याचे तसेच अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचे आश्वासन देशबांधवांना दिले. होस्नी मुबारक व त्यानंतर मोहंमद मुर्सी अशी सलग दोन सरकारे पायउतार झाल्यामुळे इजिप्तमध्ये गेल्या तीन वर्षांपासून राजकीय अस्थिरता होती. जनआंदोलनामुळे मुबारक यांना सत्ता सोडावी लागल्यानंतर लोकशाही पद्धतीने निवडून आलेले मोहंमद मुर्सी सरकार इजिप्तचे पहिले लोकनियुक्त सरकार ठरले होते. मात्र, या सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष पेटल्याने लष्करप्रमुख सिसी यांनी ते उलथवून टाकले होते.
इजिप्तमध्ये सिसी यांचा शपथविधी
By admin | Published: June 09, 2014 5:28 AM