नवी दिल्लीः अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतल्यानंतर परिस्थिती प्रचंड बिघडली आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या 70-80 टक्के भागांवर ताबा मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कांधारमधील भारतीय दूतावास बंद करुन आपल्या सर्व अधिकाऱ्यांना परत बोलावले होते. कांधारनंतर आता मजार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आपल्या सर्व राजदूत, अधिकारी आणि इतर भारतीयांना परत आणण्यासठी एका विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे. हे विमान बुधवारी सर्व भारतीयांना घेऊन परतेल.
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यामुळे तालिबानचे हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तानची परिस्थिती बिकट होत चालली असल्यामुळे भारताने आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना कांधारमधून आधीच बाहेर काढले होते. आता मजार-ए-शरीफमधूनही सर्व भारतीयांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी आज संध्याकाळी मजार-ए-शरीफ ते दिल्लीसाठी एक विशेष विमान उड्डाण करणार आहे. मजार-ए-शरीफ येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ही माहिती दिली.
मजार-ए-शरीफमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने ट्विट केले, "एक विशेष विमान मझार-ए-शरीफ येथून नवी दिल्लीकडे रवाना होईल. मजार-ए-शरीफ आणि आसपासच्या परिसरातील कोणत्याही भारतीय नागरिकाला विनंती केली जाते की तो उशिरा सुटणाऱ्या विशेष विमानाने भारतासाठी रवाना होण्यासाठी तयार रहा."
वाणिज्य दूतावासाच्या दुसर्या एका ट्विटमध्ये सांगण्यात आले की, भारतात येणाऱ्या विशेष विमानात येण्याची इच्छा असलेल्या भारतीय नागरिकांनी त्यांचे पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक, व्हॉट्सअॅपद्वारे खालील क्रमांकावर द्यावी: 0785891303, 0785891301 "