ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 19 - दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-याला चीन विरोध करत असतानाच चीननं भारतावर आता कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताचा अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील सहा भागांवर चीननं दावा केला असून, त्या ठिकाणांचं चिनी भाषेत चीनकडून नामकरण करण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांना चीनने अधिकृतरीत्या नावे दिल्याचे वृत्त ग्लोबल टाइम्समधून प्रसिद्धीस देण्यात आलं आहे. चीननं पहिल्यांदाच मानकीकृत अधिकारांनी अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांचं नामकरण केलं आहे. चीनच्या मंत्रालयानं 14 एप्रिलला याची घोषणा केली होती. त्यांनी चिनी सरकारच्या नियमांनुसार दक्षिण तिबेट (अरुणाचल प्रदेश)च्या सहा ठिकाणांच्या नावांना चिनी, तिबेट आणि रोमन वर्णांनुसार मानकीकृत केलं आहे. या सहा ठिकाणांचं वोग्यानग्लिंग, मिला री, क्वीडेंगार्बो री, मेन्क्युका, बुमो ला आणि नामकापुब री असं रोमन वर्णांनुसार नामकरण केलं आहे. भारत ज्या भूभागाला "अरुणाचल प्रदेश" असे संबोधतो त्या "दक्षिण तिबेट" येथील सहा ठिकाणांना चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रोमन भाषेतील वर्णानुसार नावे दिली आहेत", असे वृत्त चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने दिले आहे. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यामुळे भारत-चीन या देशांमधील सीमाप्रश्नावर संबंध कमालीचे ताणले गेल्याचे चीननं म्हटलं आहे. आता पुन्हा अरुणाचल प्रदेशमधील सहा परिसरांचे चीनने नामकरण केल्याचे जाहीर करत हक्क दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारत-चीनदरम्यानच्या 3 हजार 488 किलोमीटरवरील प्रत्यक्ष सीमारेषेवरून दोन्ही देशात वाद आहेत. भारताच्या अरुणाचल प्रदेशला चीनकडून दक्षिण तिबेट संबोधले जाते. भारतासोबत झालेल्या 1962च्या युद्धात चीन या क्षेत्रावर ताबा मिळवला होता. त्याला सध्या अक्साई चीन असे ओळखले जाते. तर गेल्या काही दिवसांपूर्वी चीननं अरुणाचल प्रदेशमधील तवांग देण्याची मागणी केली होती. त्यावेळी पूर्वेकडे भारतानं चीनची काळजी घेतल्यास चीनही त्याच्या मोबदल्यात (अक्साई चीन) इतर भूभाग देण्याचा विचार करेल, असं चीनकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. तवांगपासून चीनची सीमा 37 किलोमीटर अंतरावर आहे. तो परिसर बम ला पास नावानेसुद्धा ओळखला जातो.
अरुणाचलमधील सहा भूभागांचं चीनकडून चिनी नामकरण
By admin | Published: April 19, 2017 1:37 PM