शिनजियांग : चीनमध्ये एका ३२ वर्षीय तरुणाने दाढी वाढविली म्हणून सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली असून, त्याच्या पत्नीला बुरखा घेतला म्हणून दोन वर्षांसाठी तुरुंगात पाठविण्यात आले आहे. चीनमधील शिनजियांग हा प्रांत मुस्लिमबहुल आहे. तिथे दाढी वाढविणे व बुरखा घालणे यास बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उईघुर समाजातील हे दाम्पत्य २०१० पासून नियमांचे उल्लंघन करत होते. या दाम्पत्याला कारवाईचा अनेक वेळा इशारा देण्यात आला होता. मात्र दोघेही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत होते. चीनमधील नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर कायद्याचे कठोर पालन करण्यास सुरुवात झाली असून, संबंधित दाम्पत्याला न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणे व संघर्ष करणे या कलमाखाली न्यायालयाने दोघांनाही शिक्षा सुनावण्यात आली. चीनमधील शिनजियांग प्रांतात प्रोजेक्ट ब्युटी ही योजना राबविली जाते. त्याअंतर्गत पुरुषांना दाढी वाढविण्यास व महिलांना बुरखा घालण्यास बंदी आहे. चीनमधील जागतिक उईघुर काँग्रेसचे प्रवक्ते दिलक्सत रक्षित यांनी ही राजकीय शिक्षा आहे असे म्हटले असून उईघुर समाजाला चिनी परंपरा पाळायला लावण्याची ही पद्धत आहे असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
दाढी वाढविली म्हणून सहा वर्षांचा कारावास
By admin | Published: March 30, 2015 11:21 PM