कराची : जोडप्यापैकी एकाने धर्म बदलल्यास विवाह रद्द करण्याची तरतूद असलेल्या हिंदू विवाह विधेयकाच्या मसुद्यातील वादग्रस्त कलम वगळण्याची मागणी पाकिस्तानातील प्रमुख हिंदू संघटनेने केली आहे. या कलमामुळे अल्पसंख्याक हिंदू महिलांचे बळजबरी धर्मांतरणाचे प्रकार वाढतील, अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे. पाकमधील हिंदू समाज या कलमाबाबत चिंतित आहे, असे पाकिस्तान हिंदू परिषदेचे प्रमुख संरक्षक रमेश वांकाणी यांनी म्हटले. हिंदू विवाह विधेयकातील आक्षेपार्ह कलम १२ (३) चा हिंदू मुली आणि महिलांच्या धर्म परिवर्तनासाठी गैरवापर केला जाऊ शकतो. पती-पत्नीपैकी एकाने धर्मांतर केल्यास विवाह संपुष्टात येऊ शकतो, असे हे कलम म्हणते. सत्ताधारी पीएमएल-एनचे संसद सदस्य वांकाणी म्हणाले की, सिंधच्या ग्रामीण भागातील हिंदू महिला आणि मुलींच्या बळजबरी धर्मांतराचा मुद्दा सरकारसमोर उपस्थित केला असून हिंदू विवाह विधेयकातील वादग्रस्त तरतुदींमुळे बळजबरी धर्मांतराचे प्रकार वाढतील, असेही ते म्हणाले. हिंदू मुलींच्या अपहरणानंतर न्यायालयात प्रमाणपत्र सादर करून तिने धर्मांतर व मुस्लिम व्यक्तीशी विवाह केल्याचे सांगण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
हिंदू विवाह विधेयकातील वादग्रस्त कलम वगळा
By admin | Published: February 16, 2016 3:13 AM