गाझा पट्टी : इस्रायलकडून गाझात झालेल्या हल्ल्यांत आतापर्यंत ४५ हजारांपेक्षा अधिक सामान्य नागरिकांचा बळी गेला असतानाही इस्रायलकडून हल्ले सुरूच आहेत. इस्रायलकडून करण्यात आलेल्या नव्या हल्ल्यात अनेक मुलांसह किमान ५० जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात मानवतावादी क्षेत्रांनाही लक्ष्य केले गेले.
बॉम्बहल्ले सुरू असताना, बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, मोसाद गुप्तचर संस्था, शिन बेट अंतर्गत सुरक्षा एजन्सी आणि लष्कराच्या शिष्टमंडळाला युद्धविराम करारासाठी कतारमध्ये चर्चा सुरू ठेवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यावर हमासकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. युद्धाच्या गेल्या १५ महिन्यांत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील चर्चा वारंवार ठप्प झाली आहे.
हा हल्ला समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या संरक्षित क्षेत्रात झाला. सध्या येथे कडक थंडी असून, हजारो विस्थापित पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे. थंडीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या तंबूत आश्रय घेतला होता, पण नंतर अचानक इस्रायलच्या हल्ल्यामुळे संपूर्ण जगच बदलून गेले. पहाटेच्या हल्ल्यात किमान ५० लोक ठार झाले, यात मुले आणि नागरिकांचा समावेश आहे.