वॉशिंग्टन - सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वारंवार अपमानाचा सामना करावा लागत आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला अमेरिकन सरकारने साधी दखलही न घेतल्याने इम्रान खान यांना मेट्रोने प्रवास करावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी एका कार्यक्रमादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानच्या समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे इम्रान खान यांना फजितीला सामोरे जावे लागले. रविवारी येथील एका ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात इम्रान खान उपस्थितांना संबोधित करणार होते. दरम्यान, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी एका बलुचिस्तानी तरुणाने उभे राहून जोराजोरात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतरांकडूनही जोरदार घोषणाबाजी झाली. अखेरीस घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. मात्र हा प्रकार सुरू असताना इम्रान खान यांनी आपले भाषण थांबवले नाही. अमेरिकेत राहणारे बलुचिस्तानी नागरिक पाकिस्तानकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा आरोप बलुचिस्तानी नागरिकांकडून सातत्याने होत असतो. दरम्यान, पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या इम्रान खान यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नव्हता. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. इम्रान खान कतार एअरवेजच्या विमानानं सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अमेरिकेत पोहोचले होते. कतार एअरवेजच्या विमानातून अमेरिकेत दाखल झालेल्या इम्रान खान यांचा व्हिडीओ पीटीआयनं ट्विट केला आहे. यामध्ये खान एका सामान्य व्यक्तीसारखे विमानातून उतरताना दिसत आहेत. अनेकांनी यावरुन खान यांची खिल्ली उडवली.
अमेरिकेत इम्रान खान यांची पुन्हा फजिती, सभेत झाली बलुचिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 11:11 AM