Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटमध्ये आग; मंत्री म्हणाले, "स्फोट झाल्यास चेर्नोबिलच्या १० पट विध्वंस"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 07:59 AM2022-03-04T07:59:24+5:302022-03-04T08:00:00+5:30
Russia Ukraine War : रशियाकडून सातत्यानं युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. त्यामुळे आता परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ९वा दिवस आहे. दरम्यान, आता परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. रशियाकडून सातत्यानं युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्ट (Zaporizhzhia Oblast) प्रांतातील एनरहोदर शहरात मोठा हल्ला केल्याचे वृत्त समोर आलंय. दरम्यान, या हल्ल्यानंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रापासून धूराचे लोट उठताना दिसत असल्याचा दावा युक्रेनियन अधिकार्यांनी केला आहे.
युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पातून (Zaporizhzhia Nuclear Power Plant) धूर निघताना दिसत असल्याचं असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने युक्रेनच्या सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आगीनंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ले बंद करण्याचे आवाहन रशियन सैन्याला केले. "जर हा स्फोट झाला तर तो चेर्नोबिलपेक्षा १० पट मोठा स्फोट असेल! रशियन लोकांनी हे त्वरित थांबवलं पाहिजे," असं ट्वीट कुलेबा यांनी केलं.
#WATCH | Adviser to the Head of the Office of President of Ukraine Volodymyr Zelenskyy tweets a video of "Zaporizhzhia NPP under fire..."#RussiaUkrainepic.twitter.com/R564tmQ4vs
— ANI (@ANI) March 4, 2022
रशियन सैन्यानं एनरहोदर शहरावर हल्ला केला. हे शहर झापोरिझ्झिया पासून अवघ्या काही अंतरावर आहे. झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पात ६ रिअॅक्टर्स आहेत. हे युरोपमधील सर्वात मोठे, तर पृथ्वीवरील नववे सर्वात मोठे रिअॅक्टर आहेत. सध्या रशिया या ठिकाणी मोर्टार आणि आरपीजीतून हल्ला करत आहे. अणुऊर्जा केंद्राच्या काही भागांमध्ये सध्या आग लागली असून रशियानं अग्निशमन दलाच्या गाड्यांवरही गोळीबार केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.