लंडन- मोठ्या प्रमाणावर होत असेलल्या हिमवृष्टीमुळे युरोपमधील विविध शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या हिमवृष्टीमुळे स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स, आयर्लंड येथील विमानतळे बंद पडली आहेत. तसेच महामार्गांवर हिम साठल्यामुळे शेकडो लोकांना रस्त्यांवरच गाड्यांमध्ये अडकून पडावे लागले आहे. या हिमवृष्टीचा सर्वात मोठा परिणाम आयर्लंडवर झाला आहे. डब्लिन येथील विमानतळ शनिवारशिवाय सुरु होणे अशक्य दिसत असल्याचे तेथिल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच आयर्लंडमधील रेल्वेही शनिवारपर्यंत धावू शकेल अशी चिन्हे नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.गुरुवार संध्याकाळपासून आयर्लंड, नैऋत्य इंग्लंड आणि वेल्स प्रांतामध्ये ताशी १०० किमी प्रती वेगाने थंड वारे वाहण्यास आणि बर्फवृष्टी सुरु आहे. या बर्फवृष्टीमुळे दृश्यताही कमी झाली आहे. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी नागरिकांना संध्याकाळी ४ च्या आधी घरी पोहोचण्याच्या सूचना केल्या आहेत तसेच वादळ संपेपर्यंत घरीच थांबण्याची विनंती केली आहे. आयरिश स्टॉक एक्स्चेंजदेखिल शुक्रवारसाठी बंद करण्यात आले आहे.
स्वीडनमध्ये थंडीमुळे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर डेन्मार्कमध्ये एका ८४ वर्षिय महिलेचाही या थंडीमुळे मृत्यू झाला असल्याचे डॅनिश पोलिसांनी सांगितले. दृश्यता कमी झाल्यामुळे युरोपातील विमानतळे बंद करण्यात आली, त्यामुळे विमानतळांसह महामार्गांवर लोकांचा गोंधळ उडाला. जिनिवामध्ये सलग तीन तास १३ सेंटीमिटर्स इतकी बर्फवृष्टी झाल्यामुळे विमानतळ बंद पडला आहे, तसेच धावपट्टीवरील बर्फ बाजूला करण्यासाठी अनेक तासांचा अवधी लागणार असल्याने विमानतळ लवकर सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीत. स्कॉयलंडमधील ग्लासगो, एडिनबर्ग विमानतळ तसेच ब्रिटनमधील हिथ्रो विमानतळ येथील वाहतूकही बंद पडली आहे.