अबुजा (नायजेरिया) - ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती घेण्यासाठी ठरावीक कालावधीनंतर हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो, हे तुम्हाला माहीत असेलच. पण नारजेरियाच्या राष्ट्रपतींच्या हयात असण्यावरून घडलेल्या प्रसंगाबाबत वाचून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी पोलंडच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांना विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. तेथे नायजेरियन समुहाला संबोधित करताना ते खरे बुहारी आहेत की त्यांचा डुप्लिकेट आहेत, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनाचा आपण जिवंत आहोत, असे स्पष्टीकरण द्यावे लागले.दरम्यान, नायजेरियाच्या राष्ट्रपतींनी या अफवेचे खंडन केले. तसेच अफवा पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले. ''पोलंडमध्ये नायजेरियन नागरिकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मी खरा आहे की क्लोन असा प्रश्न विचारण्यात आला. ही अफवा माझ्यासाठी धक्कादायक नव्हती. कारण गतवर्षी मी प्रकृतीच्या कारणांमुळे सुट्टी घेटतल्यावर अनेक जणांनी माझा मृत्यू झाल्याचे मानले होते." असे ट्विट त्यांनी केले. ''मी जिवंत आहे, याचा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो. आता मी लवकरच माझा 76 वा वाढदिवस साजरा करणार आहे."असे त्यांनी सांगितले. नायजेरियाचे राष्ट्रपती बुहारी यांच्या मृत्यूचे वृत्त ट्विटर, फेसबूक आणि यूट्यूबवरून पसरले होते. तसेच त्यांच्या जागी सत्तेवर बसलेली व्यक्ती ही त्यांचा डुप्लिकेट असल्याचा दावा करण्यात येत होता.
म्हणून या देशाच्या राष्ट्रपती सांगावे लागले, 'अभी हम जिंदा है!'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 9:42 PM