...तर भाजपचा पराभव शक्य, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 11:33 AM2023-06-01T11:33:31+5:302023-06-01T11:33:56+5:30
कर्नाटकातील विजयाचा पाया ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून घातला गेल्याचं केलं वक्तव्य.
सांता क्लारा (अमेरिका) : भारतातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जर विरोधकांची योग्यरीत्या एकजूट झाली तर केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव होऊ शकतो, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे अनिवासी भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करताना व्यक्त केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा पक्ष या संदर्भात काम करत आहे आणि याबाबत योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. मंगळवारी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सिलिकॉन व्हॅली कॅम्पसमधील एका कार्यक्रमात प्रश्नांची उत्तरे देताना गांधी म्हणाले की, एक राजकारणी म्हणून मी भाजपचा कमकुवतपणा स्पष्टपणे पाहू शकतो... जर विरोधी पक्ष योग्य पद्धतीने तयार झाला तर भाजपचा पराभव होऊ शकतो. कर्नाटकमध्ये काँग्रेसने निवडणुका लढण्यासाठी पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन स्वीकारला, कर्नाटकातील विजयाचा पाया ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून घातला गेला.
पंतप्रधान देवालाही समजावून सांगतील...
भारतात असे लोक आहेत ज्यांना वाटते की, ते देवापेक्षा जास्त जाणतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे उदाहरण आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी कॅलिफोर्निया येथे अमेरिकी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसद्वारे आयोजित ‘मोहब्बत की दुकान’ कार्यक्रमात केली.
‘हे लोक इतिहासकारांना इतिहास, शास्त्रज्ञांना विज्ञान आणि सैन्याला युद्ध कसे लढायचे ते सांगू शकतात. मुद्दा असा आहे की, ते ऐकायला तयार नाहीत. जर तुम्ही मोदीजींना देवाजवळ बसवले तर ते देवाला समजावून सांगतील की, हे विश्व कसे चालते आणि देवालाही आश्चर्य वाटेल की, मी काय निर्माण केले आहे!’
धक्काबुक्की झाल्यानंतर म्हणाले...
कॅलिफोर्नियातील कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खलिस्तानी समर्थकांच्या एका गटाने धक्काबुक्की केली, ज्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या भाषणात काही काळ व्यत्यय आणला. राहुल गांधींनी घोषणाबाजीला उत्तर देताना स्मितहास्य केले आणि म्हणाले, ‘स्वागत आहे, स्वागत आहे... नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान.’ त्यानंतर त्यांनी समर्थकांसह प्रेक्षकांमध्ये सामील होऊन ‘भारत जोडो’च्या घोषणांनी उत्तर दिले.
अध्यक्ष ठरवणार पंतप्रधानपदाचा उमेदवार
विरोधी एकजुटीसाठी आम्ही काम करत आहोत; परंतु मला वाटते की, भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी एकजुटीपेक्षा आणखी काहीतरी जास्तीचे लागेल, त्यासाठी पर्यायी दृष्टिकोन हवा आहे.
भारत जोडो यात्रा ही अशी दृष्टी निर्माण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते. ‘भारत जोडो यात्रे’च्या कल्पनेशी कोणताही विरोधी पक्ष असहमत असणार नाही,’ असे ते म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवतील.
समस्या बदलणार नाहीत : काँग्रेस
बेरोजगारी, वाढती महागाई आणि द्वेषाचा प्रसार हे लोकांना त्रास देणारे खरे मुद्दे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा आणि त्यांच्या समर्थकांनी कितीही ढोल वाजविण्याचा प्रयत्न केला तरी या समस्या कायम राहतील.
जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस
राहुल ‘बनावट’ गांधी आहेत
राहुल गांधी ‘बनावट गांधी’ आहेत. त्यांना काहीच माहीत नाही, परंतु ते प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ बनले आहेत.
प्रल्हाद जोशी,
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री