- मयूर पठाडेआजकाल कोणत्याही नवजात बालकाच्या आईला विचारा, ती सांगेल, ‘सिझर’ झालं! नैसर्गिक पद्धतीनं बाळ आता जन्माला येईल की नाही, असं वाटावं, इतक्या वेगानं आता सिझर होताना दिसताहेत. नैसर्गिक प्रसुती झालेली आई मिळणं जवळवजळ दुर्मिळच.त्यासाठी काय करता येईल, याबाबत जगभर विचारविनिमिय आणि संशोधन चालू आहे. आई पालक, बाबा पालक आणि अगदी प्रसुतीतज्ञांचंही याबाबत समुपदेशन सुरू आहे. आजकाल सगळीकडेच सिझरचं प्रमाण मोठं आहे, यामागे आर्थिक कारण तर आहेच, पण त्यासाठीच्या ‘कळा’ सोसण्याची तयारी आणि वेळही आजकाल अनेकांकडे नाही. सगळ्यांना सगळं काही झटपट हवं.नवीनच आई होऊ इच्छिणाऱ्या बऱ्याच तरुण मुली तर स्वत:च डॉक्टरांना सांगतात, माझं सिझर करा. एवढं दुखणं सोसायची माझी तयारी नाही, पण माझं बाळ मात्र मला हव्या त्या तारखेला, हव्या त्या वेळेला, ‘मुहुर्ता’वरच जन्माला येऊ द्या, अशी गळही त्या डॉक्टरांना घालतात.
सिझरिअन डिलिव्हरीचं प्रमाण कमी व्हावं आणि बाळ ‘नैसर्गिकरित्या’ जन्माला यावं म्हणून अलीकडे बऱ्याच ठिकाणी ‘फोर्सेप’ आण ‘व्हॅक्यूम’ डिलिव्हरीचाही पर्याय हाताळला जातो. खरं तर पूर्ण नैसर्गिक नाही आणि पूर्ण सिझरही नाही, असा हा मधलाच प्रकार आहे. आपल्यासह अनेक देशांत या पर्यायाचा वापर सध्याही सुरू आहे. पण यासंदर्भातही अलीकडेच एक मोठं संशोधन झालं. कॅनडाच्या युनिव्हर्सिटी आॅफ कोलंबियाच्या शास्त्रज्ञांनी एक विस्तृत अभ्यास केला. हा अभ्यास होता, चिमट्याच्या साहाय्यानं केलेली ‘फोर्सेप’ डिलेव्हरी, व्हॅक्यूम डिलेव्हरी चांगली की सिझर?या शास्त्रज्ञांचं एकमतानं म्हणणं पडलं की, त्यापेक्षा ‘सिझर’ केव्हाही चांगलं! याचं मुख्य कारण म्हणजे अनेक देशांत आणि हॉस्पिटल्समध्ये त्यासंदर्भात ऐनवेळची आपत्कालिन परिस्थिती हाताळता येऊ शकेल अशी यंत्रणाच नाही. त्यामुळे उलट परिस्थिती आणखी बिकट होते आणि त्यामुळे बाळाला आणि बाळाच्या आईलाही आणखी कॉम्प्लिकेशन्सला सामोरं जावं लागू शकतं.
संशोधकांचं म्हणणं आहे, प्रसुतीसाठी फोर्सेप आणि व्हॅक्यूम डिलिव्हरीच्या तंत्राचा वापर करताना आलेल्या अडचणी जर नीट हाताळता आल्या नाहीत, तर त्यामुळे होणारा धोका सिझेरिअन प्रसुतीपेक्षा तब्बल पाच पटींनी वाढतो. त्यामुळे बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या जीवालाही धोका संभवू शकतो.शास्त्रज्ञांनी त्यासाठी तब्बल दहा वर्षे दोन लाख डिलिव्हरींचा अभ्यास केला. त्यांचा डाटा तपासला. फोर्सेप आणि व्हॅक्यूम डिलिव्हरी तंत्राचा वापर करताना ऐनवेळी आलेल्या अडचणींमुळे सुमारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त वेळा तज्ञ डॉक्टरांना हस्तक्षेप करावा लागला आणि तातडीची मदत पुरवावी लागली.