कोलंबो : विद्यमान सरकार आपल्याविरुद्ध ‘राजकीय द्वेषाने’ काम करीत असून, आपल्या सरकारने बजावलेली कामगिरी मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे. अल्पसंख्याक तामिळ समुदायाशी मनोमिलन घडवून आणण्यासाठीच आपण ‘लिट्टे’ विरुद्धचे युद्ध समाप्त केले, असा दावा श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी केला आहे.पोल्लोन्नारुवा या ग्रामीण भागातील गावात एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, विद्यमान अध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना ‘लिट्टे’विरुद्ध आपल्या सरकारने केलेली कारवाई जनतेच्या मनातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.मैत्री स्थापन करण्यासाठीच मी युद्ध समाप्त केले आणि आपल्या राजवटीच्या अंतिम टप्प्यात तामिळ नागरिकांना त्यांच्या मालकीची जमीन परत करण्यास प्रारंभ केला होता. ते म्हणाले की, मी निवडणुकाघेतल्या आणि या भागात स्थिती समान्य करण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला; पण सध्याचे सरकार राजकीय द्वेषातून वेळ वाया घालवत आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता केवळ चौकशा करण्यात वेळ वाया घालवत आहे. (वृत्तसंस्था) राजपक्षे यांचे सरकार अल्पसंख्याक तामिळ आणि मुस्लिम समुदायात अलोकप्रिय बनले होते. त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत सिरिसेना यांना पाठिंबा दिला होता. राजपक्षे सत्तेवरून गेल्यानंतर त्यांनी केलेल्या अनेक गैरप्रकारांची सरकारने चौकशी सुरू केली आहे.
...म्हणून ‘लिट्टे’शी युद्ध संपवले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 4:27 AM