...तर कच्चे तेल ३०० डॉलरने खरेदी करावे लागेल; पेट्रोल-डिझेल खरेदीवरून रशियाची थेट धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 05:28 AM2022-03-09T05:28:26+5:302022-03-09T05:28:38+5:30
जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात रशियाचा वाटा ८ टक्के असून, युरोप ३०% पुरवठा करते. युरोपीय महासंघासह आम्ही रशियाचा कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवू असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती १४० डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रशियाच्या तेल पुरवठ्यावर निर्बंध लादण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिका आणि युरोपला रशियाने इशारा दिला आहे. जर अमेरिका आणि युरोपियन महासंघ आमच्यावर अशाप्रकारचे निर्बंध लादण्याचा विचार करत असेल तर कच्चे तेल ३०० डॅालरने खरेदी करण्यासाठी तयार रहा, अशी धमकी रशियाच्या एका मंत्र्याने दिली आहे.
रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर निर्बंध लादल्यास पाश्चात्त्य देशांना कच्च्या तेलासाठी प्रतिबॅरल ३०० डॉलर मोजावे लागतील, असे रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी म्हटले आहे. अशा कोणत्याही बंदीचा जागतिक बाजारावर मोठा परिणाम होईल. जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात रशियाचा वाटा ८ टक्के असून, युरोप ३०% पुरवठा करते.
युरोपीय महासंघासह आम्ही रशियाचा कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवू असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती १४० डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या आहेत.
...तर जर्मनीचा गॅस पुरवठा बंद करू
रशियाच्या इंधन पुरवठ्यावर बंदी घालण्याचा विचारही करू नका, अन्यथा आम्ही जर्मनीला होणारा गॅस पाइपलाइनचा पुरवठा बंद करू, असा इशारा नोव्हाक यांनी युरोपीय देशांना दिला आहे. जर युरोपला आमच्याकडून तेल विकत घेणे थांबवायचे असेल तर ते भरून काढण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल. या काळात महाग तेल विकत घेण्याची तयारी ठेवावी तुम्हाला ठेवावी लागेल.
शहाणपणाने निर्णय घ्या : युरोपीय देशांनी स्वतःच्या हिताचा विचार करायला हवा, असे नोव्हाक म्हणाले. अशा परिस्थितीसाठी आम्ही आधीच तयार आहोत. आमच्या पुरवठ्यावर परिणाम झाला तर आम्ही इतर बाजारपेठेत पुरवठा सुरू करू. युरोप आपल्याकडील ४० टक्के गॅस खरेदी करतो. आमचा पुरवठा बंद झाल्याची भरपाई कशी करणार? याक्षणी आम्ही असे कोणतेही निर्बंध लादण्याचा विचार करत नाही; परंतु जर युरोप पुढे गेला तर आम्हालाही कठोर व्हावे लागेल, असे नोव्हाक यांनी म्हटले आहे.