एका सोशल मीडिया स्टार मुलीला आपल्याच आईच्या सीक्रेट बॉयफ्रेंडच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आहे. तरूणीचं नाव महक बुखारी असून ती 24 वर्षांची आहे. आपल्या आईचा 21 वर्षीय बॉयफ्रेंड साकिब हुसैन आणि त्याच वयाच्या त्याच्या मित्राचा तिने अपघात घडवून आणला. ज्यात दोघांचाही मृत्यू झाला. तिने फेब्रुवारी 2022 मध्ये हे कृत्य केलं होतं.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, हुसैनने कथितपणे महकची 46 वर्षीय आई अंसरीन बुखारीला ब्लॅकमेल केलं होतं की, तो तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेल. जेणेकरून दोघांच्या नात्याबाबत सगळ्यांना कळेल. तेव्हा अंसरीनला हे नातं संपवायचं होतं.
याच आठवड्यात इंग्लंडच्या लीसेस्टर क्राऊन कोर्टमध्ये ज्यूरीने अंसरीनला सुद्धा दोषी ठरवलं होतं. अशात महकने आपल्या आईची मदत करण्याचा निर्णय घेतला. तिने व्हॉट्सअॅपवर मेसेज केला की, 'मी लवकरच काही लोकांना पकडवून देणार'.
महकने त्यानंतर प्लान केला. ती हुसैनला म्हणाली की, त्याने त्याच्या नात्याबाबत तोंड बंद ठेवावं आणि त्या बदल्यात 3 हजार डॉलर दिले जातील. जेव्हा हुसैन आपल्या मित्रासोबत पैसे घेण्यासाठी निघाला तेव्हा दोन गाड्या त्यांचा पाठलाग करत होत्या. त्याने पोलिसांना फोन केला आणि याबाबत सांगितलं. हुसैन म्हणाला की, त्याला मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्या किंचाळीनंतर फोन बंद झाला. कारचा अपघात झाला होता. ज्यात दोघांचाही मृत्यू झाला.
गाडी चालवणाऱ्या 29 वर्षीय रेखान कारवान आणि 23 वर्षीय रइस जमाल यांनाही हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं. सोबतच प्लानमध्ये सहभाही असल्याने 23 वर्षीय तनाशा अख्तर, 28 वर्षीय अमीर जमाल आणि 23 वर्षीय सनफ गुलामुस्तफा यांनाही दोषी ठरवण्यात आलं. हे लोक हुसैनचा पाठलाग करणाऱ्या कारमध्ये होते. यांना लवकरच शिक्षा सुनावली जाईल.