नवी दिल्ली - देशातील टेलिकॉम क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेली रिलायन्स जियोमध्ये लवकरच परदेशी कंपनी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळत आहे. जगभरात 13 व्या क्रमांकावर असलेले श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या जियोमध्ये जपानच्या सॉफ्टबॅंकने गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. जपानची ही कंपनी 20 हजार कोटी जियोमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
करोडपती मुकेश अंबानी यांनी जियोमधील काही हिस्सा विकण्यासाठी इच्छुक आहेत. आरआयएलने टेलिकॉम क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी रिलायन्स जियोला कोट्यावधी रुपये दिले होते. आत्तापर्यंत तीन लाख कोटींचे कर्ज जियोच्या डोक्यावर असल्याने भार हलका करण्यासाठी मुकेश अंबानीकडून जियोमधील काही शेअर्स विकण्याची तयारी दर्शवली आहे. आर्थिकतज्ज्ञांच्या माहितीनुसार हा व्यवहार मुकेश अंबानीच्या उत्तम बाजार कौशल्याचं उदाहरण आहे.
जेपी मॉर्गन यांच्या माहितीनुसार, जपानमधील सॉफ्टबॅंक खूप दिवसांपासून जियोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक होती. मागील दोन वर्षापासून अनेक गुंतवणुकदारांशी चर्चा सुरु होती. ज्यामध्ये सॉफ्टबॅँक या जपानमधील टेलिकॉम कंपनीने जियोमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचं दिसून आलं. रिलायन्स जियो गेल्या तीन वर्षापासून भारतात टेलिकॉम क्षेत्रात अग्रगण्य राहिली आहे. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणं भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र प्रत्यक्षात सॉफ्टबँक रिलायन्स जियोमध्ये कितपत पैसे गुंतवणूक करणार हे सांगणे कठीण आहे. कारण येणाऱ्या काळात रिलायन्स ई-कॉमर्स माध्यमातूनही व्यवसाय सुरु करणार असल्याचं बोललं जातंय. पीटीआयच्या वृत्तानुसार जियोमधील शेअर्स खरेदी करण्यासाठी सॉफ्टबॅंक कंपनी कायदेशीर प्रक्रियेवर काम करत आहे. मात्र या व्यवहारावर बोलण्यासाठी रिलायन्स आणि सॉफ्टबँक कंपनीकडून नकार देण्यात आला आहे.
अंबानी यांच्या व्यवसायावर सौदी अरबमधील आरामको कंपनीचीही नजर
सौदी अरबमधील आरामको या कंपनीमधील रिलायन्स क्षेत्रातील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातील 25 टक्के भागीदारी खरेदी करणार असल्याची माहिती आहे. हा व्यवहार 10 ते 15 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सौदी अरबमधील सगळ्यात मोठी तेल निर्यात कंपनी आरामको मागील चार महिन्यांपासून रिलायन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहे. या व्यवहारासाठी सौदी अरबचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुकेश अंबानी यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे.