ऑक्टोबरमध्ये न जाणवलेली हिट आता मार्चमध्ये जाणवू लागलेली आहे. अवघा भारत यामुळे हैराण झाला आहे. अंगाची लाहीलाही होत आहे, अनेक ठिकाणी आगी लागत आहेत. हे कमी की काय म्हणून सूर्याने ओकलेली आग आज पृथ्वीवर धडकणार आहे. यामुळे पृथ्वीवर उष्णतेच्या संकटासोबत अन्य समस्या देखील उत्पन्न होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
पंधरवड्यापूर्वी सूर्यावर एक स्फोट झाला होता. यामुळे अंतराळात सौर वादळ निर्माण झाले आहे. हे वादळ १४ मार्चनंतर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येऊ लागले आहे. ते आज पृथ्वीवर आदळणार असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
नासानुसार या वादळाचा वेग 21,85,200 किमी प्रति तास आहे. हे वादळ पृथ्वीच्या ८० टक्के भागावर आदण्याची शक्यता आहे. या सौर वादळामुळे रेडिओ, जीपीएस सारख्या सेवा प्रभावित होऊ शकतात. यावेळी आधीच्या वादळापेक्षा तिप्पट धोका आहे. न्यूझीलंड आणि न्यूयॉर्कच्या आकाशात तीव्र प्रकाश दिसणार आहे.
गेल्या काही वर्षांत सूर्यावर खूप कमी हालचाली दिसल्या आहेत. यास सोलार मिनिमम अवस्था म्हणतात, आता सोलार मॅक्सिमम अवस्थेकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. हे २०२५ नंतर आणखी वेगवान होईल असा नासाचा अंदाज आहे.
पृथ्वीवर काय परिणाम...सौर वादळांमुळे पृथ्वीच्या बाह्य वातावरणातील तापमानवाढीचा थेट परिणाम उपग्रहांवर होणार आहे. यामुळे GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. पॉवर लाईनमधील करंट जास्त असू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो. सहसा हे क्वचितच घडते.