वॉशिंग्टन/संयुक्तराष्ट्रे : आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या चाचणीने उत्तर कोरियाने संपूर्ण जगापुढे गंभीर धोका निर्माणकेल्याने सर्व देशांनी किम-जाँग-उन यांच्या राजवटीशी असलेले सर्वसंबंध तोडून दबाव टाकावा, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. युद्ध झालेच तर उत्तर कोरिया पूर्णत: उद्ध्वस्त होईल, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.संयुक्त राष्टÑाच्या सुरक्षा परिषदेच्या तातडीने बोलाविण्यात आलेल्या बैठकीत अमेरिकेचे राजदूत निक्की हॅली यांनी सर्व देशांना उत्तर कोरियाला एकटे पाडण्याचे आवाहन केले. उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संपर्क साधून उत्तर कोरियाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करण्याची गळ घातली. चीन हा उत्तर कोरियाचा एकमेव मोठा मित्र देश आणि व्यापारी भागीदार आहे.कच्च्या तेलाचा पुरवठा बंद केल्यास उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेला तडाखा बसेल. सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियाचा संयुक्त राष्ट्रातील मतदानाचा हक्क काढून घ्यावा, असे आवाहनही हॅली यांनी केले. उत्तर कोरियाच्या कुरापतीने निर्माण झालेली स्थिती आणि उत्तर कोरियाला वठणीवर आणण्यासाठी काय पावले उचलणे जरुरी आहे, या मुद्द्यावर विचार करण्यासाठी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलाविण्याची विनंती अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने केली होती. (वृत्तसंस्था)...तर शिल्लक राहणार नाहीक्षेपणास्त्राची चाचणी घेऊन उत्तर कोरियाने युद्धाचा धोका वाढवला आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम-जाँग-उन यांच्या या दु:साहसामुळे जग युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. युद्ध झालेच तर उत्तर कोरियाचा मागमूसही शिल्लक राहणार नाही. पूर्णत: उद्ध्वस्त होईल, असा सज्जड इशारा निक्की हॅली यांनी दिला.
उत्तर कोरियाला एकटे पाडा, अमेरिकेचे जगाला आवाहन, युद्ध झाल्यास उद्ध्वस्त क रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:47 AM