लंडन - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी डोकलाम प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. लंडनमधील एका कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "कुणी येतो, तुमच्या तोंडावर चापट मारून जातो आणि तुम्ही नॉन अजेंडा चर्चा करता?" काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग अनौपचारिक भेट झाली होती. त्याचा संदर्भ घेत राहुल गांधींनी टीका केली. सध्या युरोप दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींकडून होत असलेल्या परखड टीकेमुळे भारतातील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. या दौऱ्यात राहुल गांधी सातत्याने संघ आणि भाजपावर टीका करत आहेत. दरम्यान, लंडनमधील इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी संसदीय विशेषाधिकारामुळे आपण डोकलामबाबर संसदीय समितीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती देऊ शकत नाही असे सांगितले. तसेच डोकलामप्रश्नी आपण परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिवांसोबत चर्चा केली होती, अशी माहिती दिली.
"मात्र असे असले तरी डोकलाममध्ये चिनी सैनिक अजूनही उपस्थित आहेत, ही बाब तुम्हाला माहितच आहे. तिथे चीनने मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान वुहानला गेले. पण त्यांनी डोकलामवर चर्चा केली नाही. तेथील बांधकामांवर चर्चा केली नाही. त्यांनी नॉन अजेंडा चर्चा केली. कुणी येतो, तुमच्या तोंडावर चापट मारतो आणि तुम्ही त्याच्यासोबत नॉन अजेंडा चर्चा करता, ही बाब विचित्र आहे, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले."