लंडन: १९ मार्च १९८६ रोजी शेतकरी साहेबराव करपे कुटुंबीयांनी आत्महत्या केली होती. या अनुषंगाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसीय अन्नत्याग महाराष्ट्रात केला गेला. किसानपुत्र चेवेनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप व डॉ. ऋषीकेश आंधळकर यांनी सातासमुद्रापार लंडन येथे अन्नत्याग केला. यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ़ लंडनलगत असलेल्या महात्मा गांधी पूतळ्यासमोर त्यांनी उपोषण करत शेतकरी आत्महत्येबाबत सहवेदना व्यक्त केली.
मूळात शेतकरी चळवळीत वाढलेले ॲड. दीपक चटप हे चंद्रपुर जिल्ह्यातील आहे. पाथ या कृतीयुक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकरी, कामगार, आदिवासी आदींच्या प्रश्नांना रचनात्मक मार्गाने वाचा फोडण्याचे काम करत आहे. सद्या लंडन येथिल एस.ओ.ए.एस. विद्यापीठात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण सुरु आहे. तर डॉ. ऋषीकेश आंधळकर यांनी इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. सद्या जागतिक सार्वजनिक आरोग्य धोरण या विषयात क्वीन मेरी यूनिवर्सिटी ऑफ लंडन येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. या दोघांनी केलेल्या सामाजिक कामाची दखल घेत यंदा दोघांनाही ब्रिटिश सरकारने चेवेनिंग शिष्यवृत्ती दिली आहे. या माध्यमातून लंडन येथे त्यांचे उच्चशिक्षण सुरु आहे. या अनुषंगाने या दोन स्कॉलर्सचे लंडन येथिल एक दिवसीय उपोषण महत्वाचे वाटते.
२०१७ पासून दर वर्षी शेतकरी आत्महत्या सहवेदना जपत उपोषण, उपवास किंवा अंन्नत्याग केला जातो. या वर्षी विविध शेतकरी संघटनांसह अनेक स्थानिक संस्था व संघटना या उपवास आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
सिलिंग कायदा, आवश्यक वस्तु कायदा, भूमी अधिग्रहण कायदा आदी शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे, कृषी न्यायाधिकरणाची निर्मिती व्हावी आणि शेतमालाला रास्त भाव देणारी यंत्रणा उभी झाल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाही. प्रत्येक जीव महत्वाचा असुन नागरिक म्हणून शेतकऱ्यांविषयी संवेदना जपाव्या आणि धोरणात्मक बदल करण्यासाठी पाऊले शासनाने उचलावी म्हणुन अन्नत्याग करत असल्याचे ॲड. दीपक चटप व डॉ. ऋषीकेष आंधळकर यांनी मांडले.