केपटाऊन : जगभरातील बहुतांश देशात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. भारताने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला जगभरातून मागणी येत आहे. अशातच भारताने अनेक देशांना कोरोना लसीचे लाखो डोस पुरवले आहे. भारताकडून ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीचे डोसही पाठवण्यात आले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेने ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीचा वापर थांबवला आहे. (south africa suspends oxford astrazeneca covid vaccine)
देशातील शास्त्रज्ञ ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीबाबत योग्य सल्ला, सूचना देत नाही, तोपर्यंत या लसीचा वापर थांबवण्यात येत आहे, असे दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री ज्वेली मिखाइज यांच्याकडून सांगण्यात आले. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका या लसीच्या ट्रायलचा डेटा समोर आल्यानंतर सरकारकडून ही निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे.
चिमुकल्या तीरा कामतचं १६ कोटींचं इंजेक्शन दोन आठवड्यात मुंबईत; सरकारकडून ५ कोटींचा दिलासा
कोरोनाच्या नव्या प्रकारावर प्रभावी नाही
ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका लस दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवा प्रकारावर कमी प्रभावी आहे, असे ट्रायलदरम्यान समोर आले. त्यामुळे या लसीच्या वापरावर स्थगिती आणल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. दक्षिण आफ्रिका सरकारने सीरम इन्स्टिट्यूटकडून ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीचे १० लाख डोस मागवले होते. ही लस सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार होती.
फायझर लसीची ट्रायल
ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीचा वापराला स्थगिती दिल्यानंतर आता जॉनसन अँड जॉनसन किंवा फायझर लसीचे डोस मागवण्यावर विचार सुरू आहे. प्रथम शास्त्रज्ञ या लसींवर अभ्यास करतील, मग त्यावर निर्णय केला जाईल. मात्र, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीचे काय करायचे, यावर चर्चा केली जात आहे, असे सांगितले जात आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे असा निर्णय घ्यावा लागत आहे. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका लसीची चाचणी घेणाऱ्या जोहान्सबर्ग विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लस कोरोनाच्या नव्या प्रकारावर अधिक सुरक्षा प्रदान करत नाही. तिचा प्रभाव कोरोनाच्या नव्या प्रकारावर अतिशय कमी आहे.
दरम्यान, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीची दोन हजार स्वयंसेवकांवर ट्रायल करण्यात आली. यापैकी कोणालाही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. तसेच ठोस निर्णयापर्यंत पोहोचण्याइतपत डेटा अद्याप उपलब्ध झालेला नाही, असे सांगितले जात आहे.