केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी राष्ट्रीय आपत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेत पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. किनारी भाग असलेल्या क्वाजुलु-नेटल प्रांतात पुरामुळे ४०० जणांचा मृत्यू झाला असून कित्येक जण बेपत्ता आहेत. ४० हजारांहून अधिक जण बेघर झाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं दोन वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेत निर्बंध लागू होते. पंधरा दिवसांपूर्वीच अध्यक्ष रामफोसा यांनी निर्बंध मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र त्यानंतर लगेचच पुराचं संकट उद्भवलं. त्यामुळे रामफोसा यांना राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी लागली. गेल्या ४ दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं रामफोसा यांनी म्हटलं.
पुराचा फटका वाहतुकीला बसला आहे. त्यामुळे इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बाधित झाला आहे. डरबनमधून संपूर्ण देशात इंधन आणि खाद्यपदार्थ पुरवले जातात. मात्र डरबनमध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती भीषण बनली आहे. डरबन हे दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाचं बंदर आहे. केजेडएन भागातही प्रचंड पाऊस झाला आहे. काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत ४०० जणांनी जीव गमावला आहे.
आफ्रिकेतील सर्वात महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असलेल्या डरबनमध्ये पुरानं थैमान घातलं आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पूरपरिस्थितीचा फटका आणखी प्रांतांदेखील बसू शकतो. त्यामुळेच अध्यक्ष रामफोसा यांनी राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी पूल आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत.