जोहान्सबर्ग : अनेक घोटाळ्यांनी कलंकित झालेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने (एएनसी) घेतला आहे. मात्र झुमा यांनी पायउतार होण्यास कोणतीही ठराविक कालमर्यादा नसल्याने आफ्रिका खंडातील हा सर्वात प्रगत देश आणखी अनिश्चिततेच्या गर्तेत गेला आहे.प्रिटोरियाबाहेरच्या एका हॉटेलमध्ये पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सलग १३ तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर मंगळवारी पहाटे झुमा यांना पदावरून दूर करण्यावर पक्षात एकमत झाले. या निर्णयाचे स्वरूप राष्ट्राध्यक्षपदासाठी पक्षाने दिलेला उमेदवार परत बोलावणे (रिकॉल) असे आहे. पक्ष घटनेत अशी तरतूद आहे. परंतु हा फक्त पक्ष पातळीवरील निर्णय असून तो पाळण्याचे झुमा यांच्यावर देशाच्या राज्यघटनेनुसार कोणतेही बंधन नाही.‘एनसी’चे सरचिटणीस एस मगाशुले यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास झुमा तत्त्वत: तयार झाले असून त्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा वेळ देण्याचा त्यांनी प्रस्ताव केला आहे. झुमा यांच्या पदत्यागासाठी कोणतीही तारीख ठरलेली नाही. तरी पक्ष आणि झुमा यांच्यातील संवाद सुरु राहील, असे सागून मुगाशुले म्हणाले की, झुमा बहुधा बुधवारी पक्षाला आपला निर्णय कळवतील. झुमा यांचे सध्याचे उपाध्यक्ष सिरिल रामफोसा हेच त्यांचे उत्तराधिकारी होतील असे मानले जाते. खरे तर झुमा आपली पत्नी एककोसाझाना द्लामिनी यांना आपला उत्तराधिकारी म्हणून तयार करत होते. त्यासाठी त्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ‘एनसी’च्या अध्यक्षपदाच्या शर्य तीत त्यांना उतरविले होते. परंतु रामफोसा यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून झुमा यांची पक्षावरील पकड ढिली झाली व त्यांच्यात आणि रामफोसा यांच्यात सत्तासंघर्ष सुरु झाला.या अनिश्चितीमुळे दक्षिण आफ्रिकेची सूत्रे सध्या नक्की कोणाच्या हाती आहेत, हे कळेनासे झाले आहे. दरवर्षी राष्ट्राध्यक्षांकडून संसदेपुढे केले जाणारे ‘स्टेट आॅफ दि नेशन’ भाषण झाले नाही. आता २१ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पाचे काय होणार याविषयी नागरिक साशंक आहेत. त्यातच पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे.सन १९९४ मध्ये वर्णभेदी गोरी राजवट अस्ताला जाऊन दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाची पहिली निवडणूक झाली तेव्हा नेस्लन मंडेला यांच्या उत्तुंग नेतृत्वाने सत्तेवर आलेला ‘एएनसी’ हा पक्ष आताही सत्तेवर आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये या पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला होता.मंडेला यांच्या नंतर राष्ट्राध्यक्ष झालेल्या थाबो एमबेकी यांना सत्तेच्या दुरुपयोगाच्या आरोपावरून झुमा समर्थकांनी पक्ष संघटनेतील ‘रिकॉल’च्या अधिकाराचा वापर करून पदावरून दूर केले होते. आता तेच अस्त्र झुमा यांच्यावर उगारण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष पदत्यागास तयार? आफ्रिकेतील दुसरा देश अनिश्चिततेच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:50 AM