जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असतानाच आता पुन्हा एकदा वाईट बातमी समोर येत आहे. चीननंतर Omicron चा नवीन व्हेरिएंट XBB स्ट्रेन सिंगापूरमध्ये देखील आढळला आहे. तेव्हापासून सिंगापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आशियामध्ये पुन्हा एकदा कोरोना प्रकरणांचं डुप्लिकेशन होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या, बांगलादेश आणि सिंगापूर सारख्या देशांमध्ये XBB प्रकरणांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे.
फॉर्च्यूनच्या रिपोर्टनुसार, सिंगापूरमध्ये गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 5,500 प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर महिन्याभरापूर्वी रोजची सरासरी दोन हजार प्रकरणे होती. सिंगापूरमधील अधिकार्यांना सध्या याची फारशी चिंता नाही. सोमवारी आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना प्रकरणांपैकी केवळ 15 टक्के रुग्णांना पुन्हा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. जर पुन्हा संसर्ग 50 टक्क्यांच्या वर गेला तरच आपण असे मानू शकतो की ते कोरोनाची लाट आहे.
शेड्यूलच्या तीन दिवस अगोदर म्हणजेच मंगळवारी, आरोग्य मंत्रालयाने नवीन "XBB Omicron sub-variant" मुळे वाढत्या संक्रमणाचा हवाला देत Moderna चे Omicron बूस्टर लोकांसाठी उपलब्ध करून दिले. रुग्णांच्या वाढीबरोबरच सिंगापूरमध्ये रूग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. परंतु मृत्यूच्या घटनांमध्ये घट कायम आहे.
बांगलादेशातही कोरोना प्रकरणांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. तथापि, नोंदवलेली संख्या सिंगापूरपेक्षा कमी आहे. दक्षिण आशियाई देशात 3 ऑक्टोबरच्या आठवड्यात सरासरी सुमारे 500 प्रकरणे नोंदवली गेली, तर एका महिन्यापूर्वी सरासरी 300 प्रकरणे होती. त्याच वेळी, बांगलादेशमध्ये लसीकरणाचे प्रमाण 75.5 टक्के आहे.
सोमवारी, हाँगकाँगच्या आरोग्य अधिकार्यांनी सांगितले की, त्यांना XBB.1 चं शहरातील पहिलं प्रकरण आढळलं, जो XBB स्ट्रेनचा एक उपप्रकार आहे. पेकिंग युनिव्हर्सिटी आणि चांगपिंग प्रयोगशाळेतील संशोधकांनी लिहिलेल्या 4 ऑक्टोबरच्या अभ्यासात असे आढळून आले की नवीन XBB प्रकारांमध्ये अँटीबॉडी संरक्षणास हानी पोहोचवण्याची मोठी क्षमता आहे. एक्सबीबी आणि BA.2.75.2 सारख्या नवीन प्रकारांविरूद्ध मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचार कमी प्रभावी असू शकतात याची तज्ञांनाही चिंता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.