जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्सचं युद्ध विमान एफ-15 बेपत्ता झालं आहे. सोमवारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे फायटर जेट रडावरवरुन अचानक गायब झालं. या विमानाने मध्य जपानमधील कोमत्सु एअरबेसवरुन उड्डाण केलं होतं. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी म्हणजेच पाच किमी अंतर कापल्यावर हे विमान जपानच्या समुद्रावर असताना रडारवरुन गायब झालं. रिपोर्ट्सनुसार, या विमानामध्ये दोन क्रू मेंबर्स होते. हे जेट ट्रेनिंगसाठी वापरलं जात होतं.
विमानाचा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृतरित्या यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्राथमिक पाहाणीमध्ये ज्या ठिकाणाहून या विमानाचा संपर्क तुटला तेथे समुद्रात काही गोष्टी तरंगताना आढळून आल्या आहेत. सध्या तज्ज्ञांचा एक गट या विमानाचा शोध घेत आहे. तपासामध्ये काय माहिती समोर येते यावरुनच हा विमानाचं नक्की काय झालं हे सांगता येणार आहे. जपानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हे फायटर जेट त्या स्क्वाड्रनचा भाग होतं जे प्रशिक्षणादरम्यान शत्रूचं विमान म्हणून सहभागी व्हायचं.
सध्या या विमानाचा शोध घेण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इशिकावा प्रांतामधील कोमत्सु एअरबेसवरुन उड्डाण केल्यानंतर हे विमान समुद्राच्यावर गेल्यानंतर रडारवरुन बेपत्ता झालं. मंत्रालयाने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार या विमानाचा अपघात झाला आहे. सध्या शोधमोहीम सुरू आहे. जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्सचं एप-35 ए स्टील्थ जेट 2019 साली समुद्रामध्ये पडलं होतं. या विमानाचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याचं पाहायला मिळाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.