ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 25 - दक्षिण चीन समुद्रात चीनने बांधलेल्या कृत्रिम बेटाजवळ अमेरिकन नौदलाचे युद्धजहाज येऊन धडकल्याने दोन्ही देशात तणाव वाढला आहे. गस्ती मोहिमेवर असलेले अमेरिकेचे युद्धजहाज चीनच्या कृत्रिम बेटाजवळून गेले. ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे संभाळल्यानंतर प्रथमच अमेरिकन नौदलाने दक्षिण चीनच्या सागरामध्ये चीनला अशा प्रकारे थेट आव्हान दिले. सध्या दक्षिण चीनच्या समुद्राच्या मालकी हक्कावरुन वाद सुरु आहे.
संपूर्ण दक्षिण चीन सागरावर चीनने आपला हक्क सांगितला आहे. पण चीनची ही दादागिरी शेजारी देशांना अजिबात मान्य नाही. मागच्यावर्षी आंतरराष्ट्रीय कोर्टाने या प्रकरणी चीनच्या विरोधात निकाल दिला होता. संपूर्ण दक्षिण चीन सागर चीनच्या मालकीचा नसल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले होते. पण चीनला हा निकाल मान्य नाही. मालकी निर्माण करण्यासाठी दक्षिण समुद्रात चीनने छोटीछोटी कृत्रिम बेटे तयार करण्याचा सपाटा लावला आहे. दक्षिण चीन समुद्रात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असल्याने चीनने ही दादागिरी चालवली आहे.
अमेरिकेला चीनची ही अरेरावी अजिबात मान्य नसून, अमेरिकेनेही दक्षिण चीन सागरातील आपला वावर वाढवला आहे. भविष्यातील धोके लक्षात घेऊन चीन या कृत्रिम बेटांवर लष्करी सुसज्जताही वाढवत चालला आहे.
अमेरिका-चीन संबंध
ट्रम्प येण्याआधीही अमेरिकन नौदलाने दक्षिण चीन सागरात अनेक गस्ती मोहिमा राबवल्या आहेत. त्या सर्व मोहिमांना तत्कालिन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मंजुरी होती. ब्रुनेई, मलेशिया, फिलीपाईन्स, विएतनाम आणि तैवान या देशांचा चीनला कडाडून विरोध आहे. सध्याच्या अमेरिकेच्या गस्ती मोहिमेमुळे दोन्ही देशातील तणाव अधिक वाढणार आहे.
समुद्रात चीनने तैनात केले रॉकेट लाँचर्स
चीनने येथील वादग्रस्त भागात रॉकेट लाँचर्स तैनात केले आहेत. विएतनामच्या दिशेने हे रॉकेट लाँचर्स तैनात केले आहेत. मागच्या काही काळापासून चीनने दक्षिण चीन सागरात मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमवी सुरु केली असून, चीनच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेचे बारीक लक्ष आहे. दक्षिण चीन समुद्रात आमच्या ताब्यात जी बेटे आहेत तिथे आम्ही मर्यादीत प्रमाणात लष्करी तळ उभारले असून तिथे लष्करी सिद्धतेची आवश्यकता आहे असे चीनने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे.