सियोल, दि. 25 - दक्षिण कोरियातील मोबाइल निर्माती कंपनी सॅमसंगचे उत्तराधिकारी ली जेई-योंग यांना पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणी पार्क ग्यून यांना दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागले होते.
लाच देणे, अफरातफरी करणे आणि विदेशात संपत्ती लपवण्याचा आरोप ली जेई-योंग यांच्यावर आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सॅमसंग कंपनीच्या शेअर्समध्ये 1.2 टक्क्यांनी घसरण झाली.
जगातील सर्वाधिक स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे ली हे उत्तराधिकारी आहेत. त्यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. एका घोटाळ्यात लाच दिल्याचा ली यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
मार्च महिन्यात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. तत्कालीन राष्ट्राध्यक्षांना लाखो डॉलरची लाच दिल्याचा ली यांच्यासह सॅमसंगच्या इतर चार अधिकाऱ्यांवरही आरोप होता. ज्या करारासाठी ली यांनी लाच दिली होती. तो करार त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. या माध्यमातूनच ते सॅमसंगच्या प्रमुखपदी विराजमान होणार होते. सध्या त्यांचे वडील ली-कुन हे सॅमसंग समूहाचे अध्यक्ष आहेत.
दुसरीकडे ली यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ली यांचे वकील सोंग वू-चियोल यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देणार असल्याचं सांगितलं. ली हे निर्दोष असल्याचा पूर्ण विश्वास असल्याचं चियोल म्हणाले. दक्षिण कोरियाच्या कायद्यानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा रद्द करता येत नाही. एखाद्या मोठ्या उद्योजकाला 5 वर्षांची झालेली शिक्षा ही सर्वात मोठी शिक्षा असल्याचं म्हटंल जात आहे.