- लोकमत न्यूज नेटवर्क
दक्षिण कोरिया हा असा देश आहे, जिथे चिननंतर सुरूवातीला सर्वात वेगानं कोरोनाचे रुग्ण आढळायला लागले. आधी हाताच्या बोटावर मोजता येतील असे हे पेशंट काही दिवसांतच शेकड्यात आणि लगेच हजारांच्या पटीत वाढले. पण दक्षिण कोरियानं कोरोनाविरुद्ध युद्धपातळीवर लढताना केवळ कोरोनाला रोखलंच नाही, तर आपल्याकडच्या रुग्णांची संख्याही खूप मोठय़ा प्रमाणात आटोक्यात आणली. दक्षिण कोरियाला हे कसं जमलं, याबाबत जगभरातले लोक आता त्यांच्याकडे आश्चर्यानं बघताहेत. युरोप, अमेरिका आणि जगातील इतर देशांनी कोरोनाचा आवेग थोपवण्यासाठी लगेचंच लॉकडाऊन केलं, आपापले अर्थव्यवहार किमान पातळीवर आणले, लोकांचं बाहेर फिरणं बंद केलं, त्यांना कॉरण्टाइन केलं, त्यांचा एकेमेकांशी संपर्क कमी करत त्यांच्या आपापसातील प्रत्यक्ष संवादावर र्मयादा आणली. पण दक्षिण कोरियानं यातलं काहीही केलं नाही. आपला अर्थव्यवहार बंद न करताही त्यांनी कोरोनला अटकाव केला. त्यानं कसं शक्य झालं हे?. काय केलं त्यांनी?त्यांनी म्हटलं तर अतिशय साधे सोपे, पण प्रत्यक्षातले अतिशय कठीण असे उपाय योजले. कोरोनाचा प्रसार वाढायला लागल्याबरोबर त्यांनी तातडीनं अँक्शन घेतली. अतिशय मोठय़ा पातळीवर टेस्टिंग सुरू केली. जे जे कोरोनाबाधित आहेत, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना तातडीनं शोधून काढलं, त्या सर्वांवर उपचार सुरू केले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा आणिबाणीच्या प्रसंगी लोकांकडूनही मदत मिळवली. कोरोनाबाधित रुग्णांना, त्यांच्या संपर्कातील इतरांना शोधून काढण्यात सर्वसामान्य लोकांचा हातभार अतिशय मोठा होता. त्यांनी तातडीनं ही माहिती सरकारला कळवल्यानं सरकार सतर्क झालं. इतक्या कमी कालावधीत दक्षिण कोरियाला हे कसं शक्य झालं, याबाबत आता जगभरातली सरकारं त्यांच्याकडे सल्ला मागताहेत आणि त्यासंदर्भातलं टेस्टिंग किट आम्हाला पुरवावं अशी विनंतीही ते दक्षिण कोरियाला करताहेत. सुरुवातीच्या आघातानंतर दक्षिण कोरियानं स्वत:ची अशी एक सिस्टीम विकसित केली. टास्कफोर्स निर्माण केला. दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यानं सांगितलं, आतापर्यंत जगभरातल्या किमान 125 देशांकडून आम्हाला याबाबत विचारणा झाली आहे. यात अजूनही वाढ होतेच आहे. आम्ही काय केलं, काय करतो आहोत आणि आम्ही तयार केलेली केलेली किट्स असं सगळंच या देशांना हवं आहे. जगभरातील देशांशी यासंदर्भात करार सुरू आहेत, आमच्याकडील कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात या किट्सचं उत्पादन सुरू केलं आहे आणि अमेरिका, इटली इत्यादि देशांना तर कधीच त्याचा पुरवठाही सुरू केला आहे, असंही या अधिकार्यानं सांगितलं.असं असलं तरी दक्षिण कोरियाच्या या फॉर्म्युल्यर तज्ञ साशंक आहेत, कारण त्यांच्या मते हा फॉर्म्युला फुल प्रुफ नाही आणि अजून पुरेसा ‘टेस्टेड’ नाही!.