उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. परंतु किम जोंग उन यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत दक्षिण कोरियाने या वृत्ताचे पुन्हा एकदा खंडन केले आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांचे सुरक्षाविषयक एक वरिष्ठ सल्लागारांनी किम जोंग उन जिवंत आहेत, असा खुलासा केला आहे. तसेच किम जोंग उन यांची प्रकृती देखील स्थिर असल्याचा दावा मून जे-इन यांच्या वरिष्ठ सल्लागारांनी केला आहे.
किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उलट सूलट चर्चा सुरु आहे. मात्र त्यातच आता किम जोंग उन यांच्या मालकीची असलेली खास ट्रेन उत्तर कोरियामध्ये 'रिसॉर्ट' परिसरात असल्याचे सांगण्यात येत होते. वॉशिंग्टनमधील उत्तर कोरियाच्या मॉनिटरींग प्रकल्पाद्वारे सॅटेलाइटच्या फोटोनूसार, किम जोंग उन यांची ट्रेन उत्तर कोरियामधील रिसॉर्ट परिसरात उभी असल्याचे दिसून आले होते. यावर किम जोंग उन 13 एप्रिलपासून देशाच्या पूर्वेकडील रिसॉर्ट शहर असलेल्या वॉनसन येथे राहात असल्याचे देखील दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागारांनी सांगितले आहे.
दरदिवशी किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत आहेत. तसेच ह्यंग सॅन येथे किम जोंग उन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील रुग्णालयात किम जोंग उनवर उपचार का केले नाहीत, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.