Russia-Ukraine War: रशियाला पाठिंबा देणं भोवलं; युरोपमधील महत्वाच्या देशावर दक्षिण कोरिया निर्यातबंदी लादणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 03:46 PM2022-03-06T15:46:41+5:302022-03-06T15:50:02+5:30
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक पाश्चात्य देशांनी युद्धाला विरोध करत रशियावर निर्बंध लादले.
मागील दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. आतापर्यंतची परिस्थिती पाहता रशिया युक्रेनवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक पाश्चात्य देशांनी युद्धाला विरोध करत रशियावर निर्बंध लादले. परंतु तरीही रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले. पाश्चात्य देशांनी रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर कठोर निर्बंध घातले आहेत. कंपन्यांना रशियामध्ये व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. तसेच परदेशात oligarchs च्या नौका आणि लक्झरी मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सोलच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, युक्रेनवरील रशियन आक्रमणास प्रभावीपणे पाठिंबा दिल्याबद्दल युरोपमधील बेलारूस या देशावर दक्षिण कोरिया निर्यातबंदी लादणार आहे.
आतापर्यंत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध बंद करावे यासाठी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर दबाव आणला जात आहे. मात्र रशिया युद्ध थांबवत नसल्याने अमेरिकेकडून रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेनंतर आता ब्रिटनने देखील रशियावर निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनकडून रशियन उद्योगपतींना व्हिसा नाकारण्यात आला आहे. तर दुसरीकडे फ्रान्स ने देखील युक्रेनला पाठिंबा दिला आहे.
रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील रशियन सैन्याने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार केला होता. रशियन सैन्याने युक्रेनमधील अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन वगैरे देशही या बाबतीत लगेच सक्रिय झाले. तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना इशारा दिला आहे. अणुऊर्जा केंद्राचा विस्फोट झाल्यानंतर पूर्ण युरोपचा अंत होईल, असा वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी इशारा दिला.
Russia-Ukraine War: चिंता वाढली! रशियन सैन्य आता युक्रेनमधील तीसऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या दिशेने रवाना https://t.co/zBh80CtATM#RussianUkrainianWar
— Lokmat (@lokmat) March 6, 2022
जीवनावश्यक वस्तूंची रसद तोडली-
मारियुपोल, खारकीव्ह, वोल्नोवाखा आदी ठिकाणांना रशियाच्या सैनिकांनी वेढा दिला असून, जीवनावश्यक वस्तूंची रसद तोडली आहे. त्यामुळे नागरिकांचे विलक्षण हाल होत आहेत. रशियाने मारियुपोल, वोल्नोवाखा शहरांपुरता काही तासांचा युद्धविराम केला होता. मात्र, युक्रेनच्या अन्य भागांमध्ये हल्ले सुरूच ठेवले होते.
फिनलंड-अमेरिका भेट-
रशियाने, युक्रेनवर केलेले आक्रमण अन्यायकारक असल्याचे अमेरिका व फिनलंड या देशांचे मत आहे. अमेरिकेने, युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठविण्यास याआधीच नकार दिला आहे. मात्र युक्रेनला आर्थिक व इतर प्रकारची मदत करण्यास अमेरिकेने पुढाकार घेतला आहे.