अंतराळाची २३ दिवसांची वारी करून आलेल्या तांदळाच्या बियांपासून चीनने पहिले पीक घेतले असून, हा ‘अंतराळ तांदूळ’ आता पुढील संशोधनासाठी वापरण्यात येणार आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये चीनने आपल्या ‘चँगए-५’ चांद्रयानात ४० ग्रॅम तांदूळ अंतराळात चंद्राच्या सफरीसाठी पाठवला होता. २३ दिवस हे बियाणे अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षणात होते. वैश्विक किरणोत्सर्गाच्याही ते संपर्कात आले होते. चीनच्या ग्वांगडाँग प्रांतातील दक्षिण चीन कृषी विद्यापीठातील संशोधन केंद्रात हे बियाणे पेरण्यात आले होते. त्याची आता सोंगणी व मळणी करण्यात आली आहे. यातून मिळालेला नवा तांदूळ १ सेंटिमीटर लांब असून, तीन मोठ्या पार्सलांत तो भरण्यात आला आहे.
‘ग्लोबल टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, यातील उत्तम दाणे प्रयोगशाळांत पैदाशीसाठी पाठविले जातील. त्यानंतरच्या टप्प्यात ते प्रत्यक्ष शेतात पेरले जातील. चीन १९८७ पासून अवकाशात बियाणे पाठवून संशोधन करीत आहे. कापूस आणि टोमॅटोच्या बियांवर अशा पद्धतीचे प्रयोग याआधी चीनने केले आहेत. चीनने २०० पेक्षा अधिक पिकांच्या ‘अंतराळ जातीं’ना उत्पादनासाठी मंजुरी दिलेली आहे. २०१८ मध्ये चीनमधील ‘अंतराळ पिकां’खालील क्षेत्र २.४ दशलक्ष हेक्टर होते.
तांदळाची नवीन जात विकसित होणे शक्य संशोधन केंद्राचे उपसंचालक गुआ ताओ यांनी सांगितले की, यातून तांदळाची नवी व अधिक उत्पादन देणारी जात विकसित होण्याची संशोधकांची अपेक्षा आहे. हा तांदूळ प्रत्यक्ष बाजारात यायला तीन ते चार वर्षे लागू शकतात. चीनच्या तांदूळ संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ शू ली यांनी ‘ग्लोबल टाइम्स’ला सांगितले की, या तांदळाच्या आणखी काही पिढ्यांची पेरण्या करून तपासणी केली जाईल. त्याचा तुलनात्मक अभ्यास केला जाईल. विभागीय तपासण्यांनंतर प्रादेशिक व राज्य पातळीवर तपासण्या होतील.