वॉशिंग्टन : एलन मस्क (Elon Musk) यांची अमेरिकन एयरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने ( Space X)इतिहास रचला आहे. कंपनीकडून पहिल्यांदाच अंतराळवीर नाही तर सामान्य नागरिकांना अंतराळात पाठविण्यात आले आहेत. चार सामान्य नागरिकांना घेऊन जाणारे स्पेसएक्सचे पहिले यान बुधवारी रात्री अंतराळात रवाना झाले. कंपनीने या मोहिमेला 'इन्स्पिरेशन -4' असे नाव दिले आहे. या मोहिमेद्वारे अंतराळ पर्यटनास प्रोत्साहन मिळणार आहे.
या चौघांनी ड्रॅगन कॅप्सूलमधून अवकाशात भरारी घेतली. हे प्रवासी तीन दिवस अवकाशात घालवतील, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनपासून 160 किमी उंच कक्षामधून जगाला प्रदक्षिणा घालतील. यानंतर हे यान पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल आणि फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरेल. दरम्यान, स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क यांची अंतराळ पर्यटनाच्या जगात ही पहिलीच एंट्री आहे. यापूर्वी, ब्लू ओरिजिन आणि व्हर्जिन स्पेस शिपनेही खासगी अवकाश पर्यटन सुरू केले.
'इन्स्पिरेशन -4' या मोहिमेचे नेतृत्व 38 वर्षीय इसॅकमॅन यांच्या हातात आहे. इसॅकमॅन हे पेमेंट कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वयाच्या १६व्या वर्षीच त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. इसॅकमन यांच्या व्यतिरिक्त, हेली अर्केनो देखील या मोहिमेवर आहेत. 29 वर्षीय हेली यांनी कर्करोगावर मात केली आहे. त्या सेंट जुडे चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलमध्ये फिजिशियन असिस्टंट आहेत. मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या इसॅकमॅन यांनी हॉस्पिटलला 100 मिलियन डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. त्यांना या मोहिमेद्वारे 100 मिलियन डॉलर जमा करायचे आहेत.
याचबरोबर, या मोहिमेत अमेरिकेच्या हवाई दलात वैमानिक राहिलेले ख्रिस सेम्ब्रोस्की आणि 51 वर्षीय शॉन प्रॉक्टर यांचा समावेश आहे. शॉन प्रॉक्टर हे एरिझोना येथील महाविद्यालयात भूशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तर हेली अर्केनो या अवकाशात भरारी घेणाऱ्या सर्वात तरुण अमेरिकन नागरिक आहेत. नासाच्या फ्लोरिडा येथील केनडी स्पेस रिसर्च सेंटर येथून स्पेसएक्सचे यानाने चौघांना घेऊन अवकाशात भरारी घेतली. चार जण तीन दिवस जवळपास 575 किमी उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहेत.