‘समोरच्या दुष्मनाला जिवंत सोडू नका... देशाच्या या शत्रूला नेस्तनाबूत करा... कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडू नका... हाणा, मारा, तुकडे तुकडे करा त्याचे...’ असं म्हणत आपल्या सैनिकांना प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढवायचं, पण समोरचा दुश्मन सर्व हत्यारांनिशी सुसज्ज असताना आपल्या सैनिकांना मात्र काहीच द्यायचं नाही, नुसतीच तोंडाची वाफ दवडत भाषणबाजी करायची..! काय होणार त्यानं? समोरचा शत्रू खतम होणं तर दूरच, पण आपल्याच नि:शस्त्र सैनिकांचा जीव जाणार, हे निश्चित!
अगदी अशीच परिस्थिती सध्या कुवैतच्या महिला सैनिकांवर ओढवली आहे. गेल्या काही वर्षांत कुवैत हा देशही कात टाकत सुधारणेच्या दिशेनं जात आहे. जी क्षेत्रं महिलांसाठी आजपर्यंत बंद होती, तीही त्यांच्यासाठी आता खुली करण्यात आली आहेत. इतकंच काय, त्यांना आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सैन्यदलातही जाण्याची परवानगी मिळाली आहे. सैन्यदलात त्यांची भरतीही करण्यात आली आहे... आपल्या धैर्य आणि शक्तीच्या बळावर देशाच्या दुष्मनाला चारीमुंड्या चीत करीत अस्मान दाखविण्याची अनमोल आणि दुर्मिळ संधी तर त्यांना मिळाली खरी... पण हाय रे दुर्दैव... शत्रूला समोरासमोर खतम करण्याची अपेक्षा आणि जिद्द बाळगणाऱ्या या महिला सैनिकांच्या हाती मात्र बंदुकच काय, कुठलंही हत्यार दिलं जाणार नाही!
या असल्या विचित्र निर्णयाला कुवैतच्या महिलांनी कडाडून विरोेध केला आहे. मागासलेल्या पुरुषसत्ताक मानसिकतेचं प्रतीक असलेल्या या निर्णयावर ताशेरे ओढताना, अजूनही तुम्ही महिलांना दुर्बळ, कुचकामीच समजता का, असं म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे. एक पाऊल पुढे जाताना, दोन पावलं मागे जाण्याचा हा प्रकार, देशाला इतिहासाच्या दरीत फेकण्याचाच प्रकार आहे, या शब्दांत त्यांनी सरकार आणि लष्करी अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले आहेत.
‘महिलांचे हात बांधून ठेवायचे आणि वाघाच्या समोर उभं करून त्याच्या तोंडात हात घालून त्याचे दात मोजायला सांगायचा, हा कुठला सुधारणावादी, समतावादी प्रकार आहे?’, असा सवाल देशातील अनेक महिलांनी विचारला आहे. कुवैत फुटबॉल असोसिएशनच्या महिला समितीच्या सदस्या आणि क्रीडा प्रशिक्षक घादीर अल-खाश्ती संतापानं विचारतात, महिला जर प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या तोडीस तोड कामगिरी बजावू शकतात, पोलीस अधिकारी बनू शकतात, तर लष्करात दाखल केल्यानंतर त्यांच्या हातापायात साखळदंड कशाला घातले जाताहेत? हाती शस्त्र न देता, असलेलं शस्त्र काढून घेत, आता लढा... असं म्हणायचं म्हणजे महिलांचं खच्चीकरण करणंच नाही का?
खाश्ती म्हणतात, १९९० मध्ये इराकी हुकूमशहा सद्दाम हुसेननं जेव्हा कुवैतवर आक्रमण केलं होतं, अमेरिकेनं हस्तक्षेप करण्याआधी सात महिने देश ताब्यात घेतला होता, त्यावेळी माझ्या आईनंसुद्धा स्वयंप्रेरणेनं सद्दामला प्रतिकार केला होता. अशा हजारो स्त्रिया त्यावेळी होत्या. इराकी आक्रमणादरम्यान माझी आई तिच्या अबायाखाली शस्त्रं लपवायची आणि कुवैतशी लढणाऱ्या सदस्यांपर्यंत पोहोचवायची. माझ्या वडिलांनीही यासाठी माझ्या आईला प्रोत्साहन दिलं होतं. मला समजत नाही, हे लोक कोणत्या आधारावर महिलांना कमकुवत मानतात?..
कुवैत सरकारनं ऑक्टोबरमध्ये महिलांना सैन्यदलात सहभागी करण्याचा निर्णय घेतला; परंतु पुराणमतवादी खासदार हमदान अल-आझमी यांनी याबाबत संरक्षणमंत्र्यांना जाब विचारल्यानंतर या निर्णयावर निर्बंध लादले गेले आणि महिलांच्या हाती शस्त्र न देण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढंच नाही, हिजाब घालण्याचं बंधनही त्यांच्यावर घालण्यात आलं.
धार्मिक पगडा असलेल्या हमदान अल-आझमी यांनी महिलांना सैन्यदलात समावेश करण्यास विरोध करताना म्हटलं, लष्कर, लढाई... या गोष्टी महिलांच्या नैसर्गिक स्वभावाला अनुकूल नाहीत. ते त्यांचं कामही नाही. (त्यांनी घरात बसून चूल आणि मूल एवढंच करावं!)..
कुवैती महिला सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थेच्या प्रमुख लुल्वा सालेह अल-मुल्ला यांचं म्हणणं आहे, आमच्या देशात अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं. त्यासाठी कोणी फतवा काढला नव्हता की आदेश दिला नव्हता. आपला देश मुस्लिम आहे, हे खरं, पण कोणतेही कायदे फतव्याच्या अधीन नसावेत. राज्यघटनेनं प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे आणि त्यावरच देशाचे कायदे आधारित आहेत. त्याचं उल्लंघन कोणालाही करता येणार नाही.
महिलांसाठी योगा असभ्य, अशोभनीय!अरब देशांमध्ये कुवैत हा सुधारणावादी देश मानला जातो. २००५ मध्ये तेथील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व कमी असलं तरी, तिथे ज्या काही स्त्रिया आहेत, त्या क्रियाशील आहेत. काही दिवसांपूर्वीच कुवैती महिलांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. कारण महिलांचा एक योगाभ्यासाचा कार्यक्रम रद्द केला गेला. पुराणमतवाद्यांचं म्हणणं होतं, महिलांनी असं काही करणं ‘अशोभनीय’ आणि ‘असभ्य’ आहे. आपल्या समाजासाठी अशा गोष्टी ‘धोकादायक’ आणि ‘उपऱ्या’ आहेत!..