कोरोना महामारीला आता जवळपास चार वर्षे झालेली आहेत. कोरोनाची साथही पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे. असे असले तरी जी २० शिखर परिषदेवर कोरोनाचे ढग दाटू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची पत्नी जिल बायडेन यांना दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. आता स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ (Pedro Sánchez) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
सांचेझ यांनीच ट्विटरवर ही माहिती दिली आहे. ''मला बरे वाटत आहे. पण मी भारतात येऊ शकणार नाही. G-20 शिखर परिषदेत स्पेनचे प्रतिनिधित्व कार्यवाहक उपाध्यक्ष नादिया कॅल्व्हिनो आणि परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युएल अल्बेरेस करतील.'', असे सांचेझ यांनी म्हटले आहे.
जिल बायडेन या जो बायडेन यांच्यासोबत भारतात येणार होत्या. जिल आणि जो बायडेन यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल 5 ऑगस्ट रोजी आला. यात जो बायडेन यांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर जिल यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्या डेलावेअर निवासस्थानी थांबल्या आहेत. तर जो बायडेन भारतात येण्यासाठी निघाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या स्वागतासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. अतिथी देवो भवाच्या धर्तीवर विमानतळ ते हॉटेलपर्यंत त्यांचे स्वागत करण्याची व्यवस्था आहे. दिल्लीतील ITC मौर्या शेरेटन हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. यापूर्वी हॉटेलमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर, बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश, बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प हे देखील राहून गेले होते.