माद्रिद-
युरोपातील देशांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू असताना स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उष्णतेपासून बचावासाठी सल्ला देताना टाय न वापरण्यास सांगितलं आहे. पंतप्रधानांनी आपल्या कर्मचाऱ्यांना टाय-फ्री कल्चर फॉलो करण्याचा आदेश दिला आहे. युरोपियन युनियनच्या ऊर्जा संकटावर व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे विधान समोर आले आहे.
"तुम्ही पहात आहात की मी देखील टाय वापरत नाही," पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी माद्रिदमधील पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्या उघड्या गळ्याच्या शर्टकडे निर्देश करत म्हटलं. ते पुढे म्हणाले की, "थोडे अधिक आरामदायक वाटल्याने तुम्ही कार्यालयात कमी एसी वापरता आणि त्यामुळे ऊर्जेची बचतही होईल"
सांचेझ यांनी सर्व मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना टाय न घालण्यास सांगितलं आहे. भविष्यात खासगी क्षेत्रही याचं पालन करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. स्पॅनिश सरकार, इतर सर्व युरोपीय देशांप्रमाणे, 'तात्काळ' ऊर्जा-बचत उपायांसाठी मसुदा तयार करत आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे रशियाने युरोपला होणारा गॅसचा पुरवठा आधीच कमी केला आहे. रशियाच्या या निर्णयानंतर युरोपियन युनियनने सर्व देशांना ऊर्जेचा कमीत कमी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
युरोपियन युनियनच्या निर्णयानंतर, स्पेनने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देणे आणि उन्हाळ्यात कार्यालयांमध्ये एसीचा मर्यादित वापर करणे आणि हिवाळ्यात रेडिएटर्स कमी प्रमाणात वापरणे यासारखे अनेक उपाय स्वीकारले आहेत. स्पेन ऊर्जा वापर कमी करण्यास सक्षम असेल अशी अपेक्षा आहे. मात्र, असं केल्यानं नेमकं किती उर्जेची बचत होईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
युरोपियन कौन्सिलने नुकतेच एक निवेदन जारी करून सांगितले की, 27 युरोपीय देशांनी, त्यांच्या आवडीच्या उपायांसह, 1 ऑगस्ट 2022 ते 31 मार्च 2023 मधील त्यांच्या गॅस मागणीशी गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या सरासरी वापराची तुलना केली. यानंतर गॅसच्या मागणीत १५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यास सहमती दाखवली. अशा पर्यायांतून युरोपियन युनियनला रशियाची गॅस डिप्लोमसीला चोख प्रत्युत्तर द्यायचं आहे.